भारताच्या संभाव्य विकास वाढीची दखल घेत जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश असलेल्या सौदी अरेबियानं गुंतवणुकीसाठी आता भारतावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. देशातील पायाभूत सुविधा आणि खाण आणि पेट्रोकेमिकल्स या क्षेत्रांमध्ये शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. सौदीचे ब्रँड अॅम्बेसेडरपदी डॉ. सऊद बिन मोहम्मद अल सती यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.

सऊद बिन मोहम्मद अल सती म्हणाले, “तेल, गॅस, खाण क्षेत्रांत सौदी अरेबियासाठी भारत हे आकर्षक गुंतवणुकीचे ठिकाण आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने सौदी भारताकडे पाहत आहे. ऊर्जा, तेल शुद्धीकरण, पेट्रोकेमिकल्स, इन्फ्रास्ट्रक्चर, कृषि, खनिजे आणि खाण क्षेत्रात सौदी अरेबिया शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या विचारात आहे,” असे डॉ. सऊद बिन मोहम्मद अल सती यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले, “सौदी अरेबियाची सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबरोबर प्रस्तावित भागीदारी दोन्ही देशांमधील वाढत्या उर्जा संबंधांचे धोरणात्मक स्वरूप प्रतिबिंबित करते. भारतातील तेल पुरवठा, वितरण, पेट्रोकेमिकल्स आणि ऑईल शृंखलांमध्ये गुंतवणूक करणे हा अरामकोच्या जागतिक नीतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या पार्श्वभूमीवर सौदी अरामकोने भारतातील उर्जा क्षेत्रात केलेली ४४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आणि त्यामाध्यमातून वेस्ट कोस्ट रिफायनरी आणि महाराष्ट्रातील पेट्रोकेमिकल प्रकल्प यासारखी प्रस्तावित गुंतवणूकी आणि रिलायन्सबरोबर दीर्घावधी भागीदारी दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधातील महत्त्वपूर्ण टप्पे दर्शवितात,”डॉ. सऊद बिन मोहम्मद अल सती म्हणाले.

सौदी अरेबिया हा भारतासाठी ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाचा देश आहे. भारताला १७ टक्के क्रुड ऑईल आणि ३२ टक्के एलपीजी गॅसचा पुरवठा सौदीकडून केला जातो.