सौदी अरेबिया आता दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी इस्लामी देशांची नाटोसारखी लष्करी आघाडी सुरू करणार असल्याचा प्रस्ताव आहे. ही आघाडी एखाद्या देशाविरोधात काम करणार नाही, पण आयसिस व इतर दहशतवादी संघटनांचा मुकाबला करील, असे पाकिस्तानच्या ‘दुनिया न्यूज’ या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. यात पाकिस्तानला आघाडीची रूपरेषा तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. ३४ मुस्लीम बहुल देशांची ही आघाडी असणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ व लष्करप्रमुख राहील शरीफ हे तीन दिवस सौदी अरेबियाला गेले होते, त्या वेळी संयुक्त लष्करी कवायतींच्या समारोपासाठी ते गेले असले तरी त्यात या नाटोसारख्या आघाडीच्या स्थापनेवर चर्चा झाली. या आघाडीत शिया बहुल व सौदी अरेबियाचा कट्टर शत्रू असलेल्या इराणला सहभागी करणार की नाही हे स्पष्ट करण्यात आले नाही. इराणवर पाश्चिमात्य देशांनी लादलेले अणुकार्यक्रमविषयक र्निबध त्या देशाने अणुकार्यक्रम थांबवण्याचे स्पष्ट केल्यानंतर मागे घेण्यात आले होते. आंतरखंडीय क्षेपणास्त्र तंत्रज्ञान निर्मितीबाबतचे र्निबध मात्र कायम आहेत. एकूण २१ देशांच्या दहशतवादविरोधी संयुक्त लष्करी कवायती उत्तर सौदी अरेबियात घेण्यात आल्या. सुन्नी अरब देशांना इस्रायल धाकदपटशा दाखवत असल्याने सौदी अरेबियाने ही लष्करी आघाडी सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे असे समजते. सौदी अरेबियात मानवी हक्कांची पायमल्ली चालू असून, इराणबरोबरच्या छुप्या युद्धात अत्याचार केले जात आहेत. मध्य पूर्वेत इराण व सौदी अरेबिया यांच्यात वर्चस्वाची लढाई तीव्र झाली आहे. सौदी अरेबियाच्या आघाडीने येमेनमध्ये हुथी बंडखोरांविरोधात युद्ध छेडले असून, मंगळवारी मस्ताबा येथील बाजारपेठेत झालेल्या हवाई हल्ल्यात ४१ नागरिक ठार झाले होते. मार्च २०१५ पासून तेथे ६२०० लोक मारले गेल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. नाटो ही संस्था शीतयुद्धाच्या वेळी रशियाचा धोका ओळखून स्थापन करण्याचे १९४९ मध्ये प्रथम मान्य करण्यात आले होते.