सौदी अरेबियानं पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तानला पाकिस्तानच्या नकाशातून हटवलं आहे. पीओकेतील मानवाधिकार कर्यकर्ते अमजद अयुब मिर्झा यांनी बुधवारी ट्विटद्वारे ही माहिती दिली. मिर्झा यांनी सौदीने प्रसिद्ध केलेल्या नकाशाचा फोटो पोस्ट करीत त्याखाली कॅप्शन दिलं की, “सौदी अरेबियाचं भारतासाठी दिवाळी गिफ्ट, गिलगिट-बाल्टिस्तान आणि काश्मीर पाकिस्तानच्या नकाशातून काढून टाकलं.” विशेष म्हणजे या पोस्टनंतर मिर्झा यांचं ट्विटर अकाउंट बंद करण्यात आलं आहे.

टाइम्सनाऊच्या वृत्तानुसार, येत्या २१-२२ नोव्हेंबरला सौदीच्या अध्यक्षतेखाली जी-२० समिट होणार आहे. या पार्श्वभूमीवर सौदी-अरेबियानं २० रियालची बँकनोट प्रसिद्ध केली आहे. या नोटेवर सौदीसह शेजारील राष्ट्र पाकिस्तानचा नकाशा छापला आहे. मात्र, यातून गिलगिट-बाल्टिस्तान आणि पीओके हा भाग वगळला आहे.

दरम्यान, १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या तथाकथीत गिलगिट-बाल्टिस्तान आणि पीओकेतील विधानसभा निवडणुकीचा अहवाल भारतानं पाहिला होता. यावर परराष्ट्र मंत्रालायनं सप्टेंबर महिन्यांत कडक आक्षेप घेतला होता. तसेच पाकिस्तान सरकारची कानउघडणी करण्यासाठी भारताने आंदोलनही केलं होतं. तसेच जम्मू आणि काश्मीर, लडाख तसेच कथित गिलगिट-बाल्टिस्तान हे भारताचे अंतर्गत भाग असल्याचं जाहिरही केलं होतं.

इम्रान खान सरकारने यापूर्वी पाकिस्तानचा नवा नकाशा प्रसिद्ध केला होता. यामध्ये त्यांनी जुनागड येथील भारताचा भूभाग, सर खाडी आणि गुजरातमधील मनवदर तसेच जम्मू आणि काश्मीर, लडाख या भागावर दावा केला होता. दरम्यान, भारतानं काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर केंद्र सरकारला विशेष अधिकार मिळाल्याने सौदी अरेबियानं हा नकाशा प्रसिद्ध केल्याचे सांगण्यात येत आहे.