सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. अमेरिकेशी असलेले घनिष्ट मैत्रीपूर्ण संबंध आणि सौदीसारख्या पुराणमतवादी देशातील विचार बदलण्यासाठी त्यांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे ते जगभरात प्रसिद्ध होते. किंग अब्दुल्ला बिन अब्दुलाझिझ अल सौद यांच्या  राजवटीत सौदीतील स्त्रियांना प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. सौदीतील शासकीय वृत्तवाहिन्यांकडून शुक्रवारी पहाटे त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली. राजे अब्दुल्ला यांच्यानंतर त्यांचे सावत्र बंधु प्रिन्स सलमान यापुढे सौदी अरेबियाची गादी सांभाळणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. भारतातर्फे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी राजे अब्दुल्ला यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला सौदी अरेबियात उपस्थित राहणार आहेत.