सौदी अरेबिया देशातील एका घटनेत नवरदेवाने आपल्या नवविवाहित पत्नीस ती मित्रपरिवाराशी फोनवर बोलत होती म्हणून तलाक दिला. मित्रपरिवाराशी फोनवर बोलण्यात व्यग्र असणाऱ्या पत्नीशी त्याने बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्याचा तो प्रयत्न व्यर्थ ठरला. ‘गल्फ न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, लग्न लागल्यापासून काही मिनिटांत हा तलाक झाला. वृत्तपत्रास नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, लग्न संपन्न झाल्यावर नवरदेव नववधूस हॉटेलमध्ये घेऊन गेला. हॉटेलच्या खोलीत पोहोचताच ती फोनवर व्यग्र झाली. नवरदेव नवरीसोबत जवळीक साधण्यासाठी तिच्या जवळ गेला असता तिने त्याकडे लक्ष दिले नाही. नवरदेवाच्या कोणत्याच बोलण्याला तिने प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, फोनवर मित्रपरिवाराकडून येणारे शुभ संदेश स्विकारत तिने फोनवरील संवाद सुरूच ठेवला. हा सर्व प्रकार पाहून चिडलेल्या नवरदेवाने तुझ्यासाठी मित्रपरिवार जवळचा आहे की नवरा असा प्रश्न विचारला असता, तिने मित्रपरिवार असे उत्तर दिले. यामुळे प्रकरणाने अधिकच गंभीर वळण घेतले. नंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि नवरदेवाने तिला तलाक देणार असल्याचे सांगितले. हे सर्व प्रकरण न्यायालयात पोहोचले, तेथून ते समन्वय समितीकडे वर्ग करण्यात आले. परंतु, नवरदेवाने काहीही ऐकण्यास नकार दिल्याचे वृत्तात म्हटले आहे.