दोन वर्षांपूर्वी जेद्दाह येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यातील हल्लेखोर भारतीय असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. सोदी अरेबियाने डीएनए चाचणीच्या आधारे हल्लेखोराची ओळख पटवली असून फय्याज कागजी असे या हल्लेखोराचे नाव आहे. कागजी हा भारतीय नागरिक असून दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा सदस्य असल्याची माहिती सौदी अरेबियाच्या एका सुरक्षा अधिकाऱ्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिली. कागजीने अमेरिकेच्या वकिलातीबाहेर स्वत:ला बॉम्बने उडवले होते. कागजी हा बीडचा असून पुण्यात २०१० साली जर्मन बेकरी आणि २०१२ मध्ये जेएम रोडवर झालेल्या बॉम्बस्फोटांचा तो मास्टरमाईंड होता.
जेद्दाह स्फोटातील आत्मघातकी हल्लेखोर हा कागजीच असल्याचे डीएनएवरून स्पष्ट झाल्याचे सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. गतवर्षी डीएनएचे नमुने सौदीला पाठवण्यात आले होते, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
जेद्दाह येथे ४ जुलै २०१६ रोजी बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये दोन सुरक्षारक्षक जखमी झाले होते. त्यादिवशी सलग तीन स्फोटांनी जेद्दाह हादरले होते. इतर दोन स्फोट हे कतीफ येथील शिया मशिदीजवळ आणि मदिना येथील मस्जिद ए नब्वी परिसराबाहेर झाले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय तपास यंत्रणेने एनआयएच्या दिल्लीतील विशेष न्यायालयाला कागजी हा मृत पावल्याचे कळवले आहे. कागजीचा भारतातील अनेक दहशतवादी कृत्यात सहभाग होता. पोलिसांच्या वाँटेड यादीत त्याचा समावेश होता.
तपास यंत्रणांच्या मते, कागजी हा महाराष्ट्रातील बीडचा असून पुण्यात २०१० साली जर्मन बेकरी आणि २०१२ मध्ये जेएम रोडवर झालेल्या बॉम्बस्फोटांचा तो मास्टरमाईंड आणि ‘फायनान्सर’ होता. त्याचबरोबर २००६ मध्ये औरंगाबादमध्ये मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा आढळून आला होता. याप्रकरणातही तो पोलिसांना हवा होता. याच प्रकरणात २६/११ मुंबई हल्ल्यातील झबीउद्दीन अन्सारी उर्फ अबु जुंदालचाही समावेश आहे. इंटरपोलच्या यादीतही कागजीचा समावेश आहे.
२६/११ प्रकरणात कागजी आरोपी नाही पण त्याने या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना हिंदी शिकवल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. जेद्दाह हल्ल्यातील आरोपीचा फोटो हा कागजीशी मिळता-जुळता होता. महाराष्ट्राच्या दहशतवादी विरोधी पथक आणि एनआयएच्या रडावर असलेला दहशतवादी कागजी हाच जेद्दाह येथील हल्ल्यातील आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कागजीचा डीएनए सौदी अरेबियाला पाठवण्यात आला होता.
कागजी २००६ मध्ये जुंदालबरोबर बांगलादेश मार्गे पाकिस्तानात पळून गेला होता. त्यानंतर तो सौदी अरेबियामध्ये गेला. लष्कर ए तोयबात तरूणांना दाखल करून घेण्याचे काम तो करत होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंतर कागजी आयसीसमध्ये दाखल झाला आणि त्याने जेद्दाहमध्ये स्फोट घडवला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2018 8:39 am