सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने येमेनमधील रेड सी शहरात केलेल्या हवाई हल्ल्यात १२० जण ठार झाले असून गेल्या मार्चनंतर हा सर्वात भीषण असा हल्ला होता, असे सुरक्षा व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या हल्ल्यानंतर मात्र सौदी अरेबियाच्या आघाडीने अचानक पाच दिवसांसाठी मानवतावादी तत्त्वावर हल्ले थांबवण्याची घोषणा केली.
शुक्रवारी रात्री उशिरा करण्यात आलेल्या या हल्ल्यात मोखा येथील वीज प्रकल्प उद्ध्वस्त झाला असून अनेक इमारती भुईसपाट झाल्या आहेत. वीज प्रकल्पात हवाई हल्ल्यांनी मोठी आग लागली असून त्यात अनेक लोक जळून ठार झाले, त्यात महिला, मुले व वृद्धांचा समावेश होता. वाहिब महंमद या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, काही मृतदेह स्फोटामुळे तुकडे होऊन पडले होते. काही ठिकाणी गुरांच्या गोठय़ांवरही हल्ले झाले त्यामुळे गुरे रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. सौदी अरेबियाच्या आघाडीने केलेल्या हल्ल्यात मोठय़ा प्रमाणात नागरिक मरण पावत असल्याचे दिसून येत आहे. हुथी या शिया बंडखोरांवर हे हल्ले चालू आहेत. डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स या जीनिव्हातील संस्थेने म्हटले आहे की, आता घरे, बाजारपेठा व कशावरही हल्ले होऊ लागले आहेत. मोखा या शहरात मोठय़ा प्रमाणावर मच्छिमार असून ते सर्वात सुरक्षित ठिकाण मानले जात होते. सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया याबाबत मिळू शकली नाही. ह्य़ूमन राईट्स वॉच व अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थांनी म्हटले आहे की, सौदी अरेबिया युद्ध नियमांचे उल्लंघन करीत आहे व नागरिकांचे मृत्यू टाळण्यासाठी प्रयत्न करीत नाही. कामगारांच्या वसाहतींवर चार हवाई हल्ले करण्यात आले, पण कामगारांना का लक्ष्य करण्यात आले हे समजू शकले नाही.