सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने येमेनची राजधानी साना येथे पोलिसांच्या इमारतीवर केलेल्या हवाई हल्ल्यात २० नागरिकांना प्राण गमवावे लागले, तर १५ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती सुरक्षाधिकाऱ्यांनी दिली.
स्थानिक सुरक्षाधिकाऱ्यांनी सांगितले की, मध्य सानामध्ये करण्यात आलेल्या या हवाई हल्ल्यात पोलिसांच्या इमारतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. या इमारतीसमोर उभ्या असलेले पोलीस वाहनही हल्ल्यात उद्ध्वस्त झाले. मृत आणि जखमींमध्ये पोलीस कर्मचारी आणि हौथी बंडखोरांचा समावेश आहे.
सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हा भाग ताब्यात घेतला असून जखमी आणि मृतांचा शोध घेण्यात येत आहे. सुरक्षा रक्षकांच्या सभा आणि हौथी बंडखोरांच्या बैठकांसाठी या इमारतीचा वापर करण्यात येत होता. रविवारी पहाटे हा हवाई हल्ला करण्यात आला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बोलताना दिली आहे.
माध्यमांशी बोलण्यासाठी शासकीय प्रवक्ता नसल्यामुळे अधिकृत माहिती मिळवण्यात पत्रकारांना अडचणी आल्या. सौदी नेतृत्वाखालील आघाडीने मार्च २०१५ पासून हौथी बंडखोरांविरोधात मोहीम राबविली आहे.