सौदी अरबमधील प्रमुख तेल उत्पादक कंपनी सौदी अरमकोच्या अबकेक आणि खुराइस येथील केंद्रांवर तीन दिवसांपूर्वीच येमेनच्या हूथी बंडखोरांनी ड्रोनद्वारे हल्ले केल्याने, इंधन दरात कमालीची वाढ झालेली आहे. शिवाय आगामी काळातही इंधन दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असताना, आता या इंधन दरावाढीमुळे चिंतेत पडलेल्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. लवकरच सौदीमधील तेल उत्पादन पूर्वपदावर येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आगामी दोन ते तीन आठवड्यांच्या आतच सौदीचे तेल उत्पादन पूर्वस्थितीत येणार असल्याचे सौदीकडून सांगण्यात आले आहे.

ड्रोन हल्ल्यानंतर सौदीमधील तेल उत्पादनात साधारण ५० टक्के घट झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोमवारी कच्चा तेलाच्या दरात २० टक्के वाढ नोंदवल्या गेली होती. जवळपास ३० वर्षानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत एवढी मोठी वाढ झाल्याचे दिसले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्रमंत्री माइक पोम्पिओ यांनी या ड्रोन हल्ल्यासाठी इराण जबाबदार असल्याचे म्हटले आहे. यानंतर या दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर इराणचे प्रमुख नेते अयातुल्लाह अली खुमैनी यांनी मंगळवारी अमेरिकेबरोबर कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यास नकार दर्शवला आहे.

ड्रोन हल्ल्यामुळे तेल उत्पादनात झालेल्या घसरणीनंतरही सौदी अरामकोच्या अधिकाऱ्यांनी रविवारी भारतीय रिफायनरींना इंधन पुरवठ्यात कमी भासू दिली जाणार नसल्याचे सांगितले होते. तर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय भारतीय रिफायनर आणि सौदी अरामको यांच्याशी सल्लामसलत करून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे, असे तेल मंत्रालयाकडू सांगण्यात आले होते.

या हल्ल्यामुळे निम्म्याहून अधिक इंधन उत्पादन उत्पादन घटले आहे आणि दररोजचा ५.७ दशलक्ष बॅरल किंवा जगातील पाच टक्के पुरवठा कमी झाला आहे. इंधन पुरवठ्यात इराकनंतर दुसरा क्रमांक सौदीचा लागतो, तर भारत आपल्या गरजेच्या ८३ टक्के तेलाची आयात करतो. सौदीने २०१८-१९ या आर्थिक वर्षात निर्यात केलेल्या एकूण २०७.३ दशलक्ष टन तेलापैकी भारताने ४०.३० दशलक्ष टन कच्चा तेलाची खरेदी केली आहे.