सौदी अरेबियाच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकांमध्ये महिलांना मतदान करण्याची संधी मिळाल्यावर तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी २० महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. सौदी अरेबियातील मोठ्या शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत विविध ठिकाणी या महिला उमेदवारांनी यश मिळवले आहे. सौदी अरेबियाच्या दृष्टीने ही निवडूणक सर्वच अर्थांनी ऐतिहासिक ठरली.
निवडून आलेल्या महिलांचे प्रमाण एकूण सदस्यांमध्ये एक टक्का इतके आहे. सौदी अरेबियातील सुमारे २१०० स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांसाठी मतदान झाले होते. यामध्ये पहिल्यांदाच महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. अद्यापही सौदी अरेबियामध्ये महिलांना गाडी चालविण्याचा अधिकार नाही. त्याचबरोबर त्यांचे पालकत्व हे पुरुषांकडेच असते. त्यामुळे त्यांनी कोणते शिक्षण घ्यायचे, कोणाशी लग्न करायचे, कुठे प्रवास करायचा याचा निर्णय पालकत्व असलेली पुरुष व्यक्तीच घेते.
निवडून येणाऱ्या महिलांची संख्या जरी कमी असली, तरी आतापर्यंत निवडणूक प्रक्रियेतून संपूर्णत वगळल्या गेलेल्या महिलावर्गाला या निमित्ताने प्रतिनिधित्व मिळाले आहे. या निवडणुकीला उभे राहिलेल्या महिलांनी कामकरी मातांच्या सोयीसाठी जास्त वेळ सुरू राहणारी पाळणाघरे, क्रीडा आणि सांस्कृतिक गोष्टींची रेलचेल असणारी युवाकेंद्रे, चांगले रस्ते, कचरासंकलन व्यवस्थेत सुधारणा आणि वनीकरण अशी आश्वासने दिली होती. सौदी गॅझेटमध्ये छापून आलेल्या वृत्तानुसार रस्त्यांची दुरवस्था आणि रुग्णालयाच्या अनुपलब्धतेमुळे मदरखा गावामधील एका महिलेची कारमध्येच प्रसूती करावी लागली होती. हा मुद्दा तेथील निवडणुकीचा विषय बनला होता.