स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये(एसबीआय) तुमचं खातं असेल आणि एसबीआयचं एटीएम कार्डही जर तुम्ही वापरत असाल तर हे वृत्त तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. एसबीआयने सर्व डेबिट कार्ड धारकांना एटीएम-कम-डेबिट कार्ड बदलण्याची सुचना केली आहे.


सर्व ग्राहकांनी ३१ डिसेंबर २०१८ पूर्वी मॅगनेटीक स्ट्रीप असलेले कार्ड बदलवून इलेक्ट्रॉनिक चिप (इव्हीएम)कार्ड घ्यावे असं आवाहन एसबीआयकडून करण्यात आलं आहे. जर कार्ड बदलवलं नाही तर सुरक्षेच्या कारणांमुळे तुमचं कार्ड ब्लॉक केलं जाईल असा इशारा एसबीआयने दिला आहे.

एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन आणि वेबसाइटवर याबबात माहिती दिली आहे. यामध्ये मॅगनेटीक स्ट्रीप असलेले कार्ड ३१ डिसेंबरनंतर ब्लॉक केले जातील, त्याऐवजी ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक चिप(इव्हीएम) कार्ड दिलं जाईल असं सांगण्यात आलं आहे. आरबीआयच्या आदेशानुसार हा बदल केला जात असल्याचंही एसबीआयकडून सांगण्यात आलं आहे. एटीएम कार्ड बदलण्यासाठी ग्राहक ऑनलाइन अर्ज करु शकतात अथवा बॅंकेच्या जवळच्या शाखेत जाऊनही कार्ड बदलण्यासाठी अर्ज करु शकतात. कार्ड बदलण्यासाठी एसबीआयकडून कोणतेही शूल्क आकारले जाणार नाही. एकदा कार्ड ब्लॉक झाल्यानंतर ते कार्ड पुन्हा अनब्लॉक करता येणार नाही. त्यामुळे जुनं कार्ड बदलणं हा एकमेव पर्याय ग्राहकांकडे आहे असं एसबीआयने आपल्या संकेतस्थळावर म्हटलं आहे.