जगभरातील ५० सर्वांत मोठ्या बँकांमध्ये सहभागी असलेल्या आणि भारतातील सर्वांत मोठी बँक भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) प्रमुख अरूंधती भट्टाचार्य यांचे वेतन खासगी बँकांच्या प्रमुखांपेक्षा खूप कमी आहे. त्यांचे वार्षिक वेतन आणि खासगी बँकांच्या प्रमुखांचे वेतन ऐकल्यास तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. त्यामुळेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मागील वर्ष ऑगस्ट महिन्यात हा मुद्दा मांडला होता. वेतन आणि भत्त्यांमुळे देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये व्यवस्थापनाच्या सर्वोच्च स्थानी प्रतिभावान लोक येत नसल्याची खंत राजन यांनी व्यक्त केली होती.

अनेक बँकांच्या वार्षिक अहवालात हा खुलासा झाला आहे की, एसबीआयच्या अरूंधती भट्टाचार्य यांना मागील वर्षी वार्षिक २८.९६ लाखांचे वेतन मिळाले होते. हे वेतन खासगी बँकांच्या तुलनेत खूप कमी आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील बँक प्रमुखांच्या पगाराची तुलना केल्यानंतर लक्षात आले की, खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर यांना मागील वर्षी २.२६ कोटी रूपये मूळ पगार, २.३३ कोटी रूपये बोनस आणि २.४३ कोटी रूपये भत्त्यांच्या स्वरूपात मिळाले आहेत. म्हणजेच त्यांचे वार्षिक ६.९१ कोटी रूपयांचे पॅकेज मिळाले.

अशाच पद्धतीने अॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक शिखा शर्मा यांना मागील वर्षी २.७ कोटी रूपये मूळ वेतन, १.३५ कोटी रूपये व्हेरियबल पे आणि ९० लाख रूपये भत्त्याच्या रूपात मिळाले आहेत. यस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांनीही अधिक वेतन मिळवणाऱ्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे. वर्ष २०१६-१७ मध्ये त्यांना ६.८ कोटी रूपये वेतन मिळाले आहे.

खासगी क्षेत्रातील दुसरी सर्वांत मोठी बँक एचडीएफसीचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी यांना मागील वर्षी १० कोटी रूपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले. त्याचबरोबर सुमारे ५७ कोटी रूपयांचे शेअरही त्यांच्याकडे आहेत. गतवर्षी मुंबईतील एका परिसंवादात रघुराम राजन यांनी बँकेच्या प्रमुखांच्या कमी वेतनावर बोलताना आपले स्वत:चे वेतनही खूप कमी असल्याचे म्हटले होते.