स्टेट बँके ऑफ इंडियाने आपल्या बचत खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. बचत खात्यामध्ये ठराविक शिलकीपेक्षा (मिनिमम बॅलन्स) कमी रकमेवर आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत कपात करण्यात आली आहे. ही कपात थोडीथोडकी नसून तब्बल ७५ टक्क्यांपर्यंत करण्याचा निर्णय बँकेनं घेतल्याने ग्राहकांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या नव्याने करण्यात आलेल्या निर्णयाचा देशातील २५ कोटी ग्राहकांना फायदा मिळणार असल्याचा अंदाज आहे.

आधीच्या नियमानुसार शहरी भागात बचत खात्यात कमी बॅलन्स असल्यास ५० रुपये दंड आकारला जात होता. या दंडाच्या रकमेत कपात करण्यात आली असून नव्या नियमानुसार आता केवळ १५ रुपये दंड आकारला जाईल असे सांगण्यात आले आहे. याबरोबरच निमशहरी भागात आधी कमी बॅलन्स असल्यास ४० रुपये दंड आकारला जायचा. ही रक्कम आता १२ रुपये झाली आहे. मात्र या दंडासोबत १० रुपये जीएसटीही लागणार आहे. त्यामुळे ही रक्कम शहरी भागासाठी २५ रुपये तर निमशहरी भागासाठी २२ रुपये होईल.

याबरोबरच तुमचे शहराच्या ठिकाणी एसबीआयमध्ये बचत खाते असेल तर तुमच्या खात्यात किमान ३ हजार रुपये बॅलन्स असणे गरजेचे आहे. ही मर्यादा आधी ५ हजार रुपये होती, मात्र आता सप्टेंबर २०१७ पासून ही मर्यादा कमी करण्यात आली आहे. तर ग्रामीण भागातील खातेधारकांना अनुक्रमे २ हजार आणि १ हजार रुपये रक्कम खात्यात ठेवणे आवश्यक आहे. एसबीआयने केवळ ८ महिन्यात आपल्या ग्राहकांकडून दंड म्हणून १,७७१ कोटी रुपये जमा केले होते. त्यामुळे बॅंकेवर विविध स्तरातून टिकाही करण्यात आली होती. त्यामुळे एसबीआयने ६ वर्षांनंतर म्हणजेच एप्रिल २०१७ पासून ग्राहकांकडून दंड वसूल करण्यात येणारी रक्कम कमी करण्यात आली होती, त्यानंतर या दंडाच्या रकमेत आता पुन्हा कपात केल्याने ग्राहकांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे.