गेल्या वर्षी १ डिसेंबर रोजी केंद्र सरकारनं देशातील सर्व टोलनाक्यांवर फास्टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी तसंच टोलनाक्यांवरील गाड्यांच्या लागणाऱ्या रांगा कमी करण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला होता. त्यानंतर अनेक वाहनधारकांनी आपल्या गाड्यांवर फास्टॅग लावून घेतले होते. परंतु जर तुम्ही स्टेट बँकेचं फास्टॅग वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. स्टेट बँकेचं फास्टॅग वापरणाऱ्यांसाठी आपल्या फास्टॅग खात्यात पॅनकार्डचा फोटो अपडेट करणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

स्टेट बँकेनं आपल्या ग्राहकांना यासंबंधी एक मेसेज पाठवला आहे. स्टेट बँकेचा फास्टॅग वापरणाऱ्या ग्राहकांना आपल्या खात्यात पॅनकार्ड अपडेट करावं लागणार आहे. जे ग्राहक ३० सप्टेंबरपू्र्वी पॅनकार्ड अपडेट करणार नाहीत त्यांना फास्टॅग रिचार्च करता येणार नाही, असं बँकेनं पाठवलेल्या मेसेजमध्ये सांगण्यात आलं आहे. यासंबंधी अधिक माहिती https://fastag.onlinesbi.com या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

जुन्या वाहनांनाही फास्टॅग अनिवार्य

१ डिसेंबर २०१७ पूर्वी विक्री करण्यात आलेल्या वाहनांनादेखील फास्टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. यासंबंधी सरकारनं एक अधिसुचना जारी केली आहे. तसंच नियमांमध्ये बदल केल्यानंतर १ जानेवारी २०२१ पासून जुन्या वाहनांनादेखील फास्टॅग अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. “१ डिसेंबर २०१७ पूर्वी विक्री करण्यात आलेल्या सर्व जुन्या वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यासाठी अधिसुचना जारी करण्यात आली आहे. तसंच आम्ही संबंधितांकडून यावर सूचनादेखील मागवण्यात आल्या आहेत. केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मध्ये करण्यात आलेल्या सुधारित तरतुदींची अंमलबजावणी १ जानेवारी २०२१ पासून करण्याचा विचार आहे,” असं केंद्राकडून सांगण्यात आलं.