ज्यांच्यावर भ्रष्टाचार किंवा गुन्हेगारीत सामील असल्यावरून खटले सुरू आहेत, अशा नेत्यांना केंद्र सरकार किंवा राज्य सरकारांनी मंत्रीमंडळात स्थान देऊ नये, असा स्पष्ट सल्ला सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने बुधवारी एका जनहित याचिकेच्या सुनावणीत दिला. असे मंत्री हे घटनात्मक नैतिकतेला आणि सुप्रशासनाच्या तत्त्वांना नख लावू शकतातच पण त्यातून घटनेवरील विश्वासालाही तडा जाऊ शकतो, हे पंतप्रधानांनी लक्षात ठेवावे, असेही खंडपीठाने नमूद केले आहे. कलंकित लोकप्रतिनिधींना मंत्री होण्यास अपात्र करावे, असे मत मात्र सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले नाही.
संयुक्त लोकशाही आघाडीच्या पहिल्या टप्प्यातील कार्यकालात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले लालूप्रसाद यादव, जयप्रकाश यादव, एम ए ए फातमी, महम्मद तस्लिमुद्दिन आणि के. वेंकटपती यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळाले होते. त्याविरोधात मनोज नरुला यांनी केलेल्या याचिकेच्या निकालात न्यायालयाने हे मतप्रदर्शन केले. विशेष म्हणजे सुप्रशासनाची हमी देत केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले असतानाच या निकालात सुप्रशासनावरूनही खंडपीठाने मोलाचे भाष्य केले आहे.
खंडपीठाने म्हटले आहे की, सुप्रशासन ही निव्वळ संकल्पना नाही, सुप्रशासन वास्तवात उतरल्याशिवाय लोकशाही परिपक्व होऊ शकत नाही. लोकशाहीत लोकहितालाच अग्रक्रम असला पाहिजे आणि अन्य सर्व गोष्टींना दुय्यम स्थान असले पाहिजे. गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या लोकांनी आपल्यावर राज्य करावे, हे लोकशाहीत लोकांना कधीच पटणार नाही.
घटनेच्या ७५ (१) अनुच्छेदात अपात्रतेचा समावेश करता येणार नाही, असे स्पष्ट करून न्यायालयाने म्हटले आहे की, पंतप्रधान अथवा मुख्यमंत्र्यांनी, आरोप असलेल्या व्यक्तींचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचा विचारच करू नये. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्याकडून घटनात्मक जबाबदारी आणि नैतिकतेने कृती करण्याची अपेक्षा आहे, असेही पीठाने म्हटले आहे. न्या. दीपक मिश्रा, न्या. शरद बोबडे आणि न्या. लोढा यांच्यासह खंडपीठात असलेल्या न्या. मदन लोकूर, न्या. के. जोसेफ या दोघांनी स्वतंत्र मतप्रदर्शन केले असले तरी तेही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंत्र्यांच्या सहभागास विरोध दर्शविणारेच आहे.
पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी, आरोपी व्यक्तींचा मंत्रिमंडळात समावेश करूच नये. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून घटनात्मक जबाबदारी आणि नैतिकतेने कृती करण्याची अपेक्षा आहे.
– खंडपीठाचे भाष्य