सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला (सीबीएसई) CBSE राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा (नीट) Neet Result निकाल जाहीर करण्याची परवानगी दिली. काही दिवसांपूर्वी मद्रास हायकोर्टाने ‘नीट’चे निकाल जाहीर करण्याला स्थगिती दिली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी होईपर्यंत ‘नीट’चे निकाल राखून ठेवले जावेत, असे हायकोर्टाने म्हटले होते. या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून आजच्या सुनावणीदरम्यान ही स्थगिती उठवण्यात आली. तसेच नीट परीक्षेचा निकाल तात्काळ म्हणजे आजच्या आज जाहीर केला जावा, असेही न्यायालयाने म्हटले. परंतु तांत्रिकदृष्ट्या हे शक्य नसल्याने न्यायालयाने निकाल जाहीर करण्यासाठीची मुदत वाढवून दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यापूर्वी नीट परीक्षेचा निकाल ८ जूनला जाहीर होणार होता. मात्र, न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे सीबीएसईकडून निकाल राखून ठेवण्यात आला होता. दरम्यान, आजच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सीबीएसईला निकाल जाहीर करण्यासाठी २६ जूनपर्यंतची मुदत देऊ केली आहे. मद्रास आणि गुजरात हायकोर्टात यासंदर्भातील आणखी एक याचिका दाखल करण्यात आली होती. यामध्ये गुजराती आणि तामिळी भाषेतील पेपरांची काठिण्यपातळी जास्त असल्याचा आक्षेप घेत विद्यार्थ्यांनी यंदाची परीक्षा प्रक्रिया रद्द ठरवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे २४ मे रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने नीट परीक्षेची निकालप्रक्रिया रोखण्याचे आदेश दिले होते. मात्र, पुढील प्रवेशांच्यादृष्टीने निकालाचे महत्त्व लक्षात घेता न्यायालयाने निकाल जाहीर करण्यावरील स्थगिती उठवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातून सुमारे पावणेतीन लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली होती. देशभरातील जवळपास साडेअकरा लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.