फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीच्या दयाअर्जावर निर्णय घेण्यात होणारा अनावश्यक आणि अनाठायी विलंब त्या आरोपीची फाशी जन्मठेपेत परिवर्तित केली जाऊ शकते, असा ऐतिहासिक निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी १५ जणांची फाशी रद्दबातल ठरवत त्यांना जन्मठेप सुनावली. यामध्ये कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन याच्या चार सहकाऱ्यांचा समावेश असून या निकालामुळे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांनाही फाशीतून दिलासा मिळणार आहे.
‘दयाअर्जावर निर्णय घेण्यात होणाऱ्या विलंबामुळे संबंधित आरोपीवर विपरीत परिणाम होतो. अशा लोकांना मृत्यूच्या छायेखाली वर्षांनुवर्षे दयाअर्जावरील निर्णयाची प्रतीक्षा करावी लागते,’ असे सरन्यायाधीश पी. सथसिवम यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा निकाल सुनावताना म्हटले. वीरप्पनच्या चार साथीदारांसह १५ जणांची फाशी जन्मठेपेत रूपांतरित करताना सर्वोच्च न्यायालयाने दया अर्जावरील निर्णयप्रक्रियेबद्दल नियमावलीही आखून दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचा फायदा राजीव गांधी हत्याप्रकरणातील चार आरोपी- संथन, मुरूगन आणि पेरारीवलन उर्फ अरिवू यांनाही होणार आहे. या आरोपींनी फाशीविरोधात केलेले दयाअर्ज ११ वर्षांपासून प्रलंबित आहेत.
दया अर्जावर निर्णय घेण्यास होणारा विलंब हा नागरिकांच्या मुलभूत हक्काचे उल्लंघन करणारा आहे, असे मत न्यायालयाने नोंदवले. ‘गुन्ह्याची तीव्रता हे विलंबाचे कारण ठरू शकत नाही’ असे सांगतानाच ‘भारतीय फौजदारी संहिता वा दहशतवादविरोधी कायदा यापैकी कोणत्याही कायद्यातंर्गत फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींबाबत हा नियम सारखाच असेल,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले.