कोळसा खाण घोटाळा प्रकरणात अडकलेले माजी केंद्रीय मंत्री संतोष बगरोडिया यांना मंगळवारी विशेष सीबीआय न्यायालयासमोर आरोपी म्हणून व्यक्तिश: हजर राहण्यापासून सूट देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
या प्रकरणात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना न्यायालयात व्यक्तिश: हजर राहण्यापासून यापूर्वी न्यायालयाने सूट दिलेली आहे. तीच सूट मिळण्यासाठी सिंग यांच्या मंत्रिमंडळात कोळसा खात्याचे राज्यमंत्री असलेले बगरोडिया यांनी अर्ज केला होता. मात्र, बगरोडिया यांनी मंगळवारी न्यायालयात हजर राहावे, त्यानंतर त्यांच्या याचिकेवर आम्ही ८-१० दिवसांत निर्णय घेऊ, असे न्या. मदन लोकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले.
महाराष्ट्रातील बांदर कोळसा खाणीचे एएमआर आयर्न अ‍ॅण्ड स्टील प्रा. लि.ला वाटप केल्याच्या प्रकरणात आरोपी म्हणून बगरोडिया यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने समन्स बजावले होते. त्याविरुद्ध त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. मनमोहन सिंग यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी बजावलेल्या समन्सला सर्वोच्च न्यायालयाने २ एप्रिल रोजी स्थगिती दिली होती. तीच सवलत बगरोडिया यांनी मागितली. परंतु तुमची याचिका फेटाळत नसलो तरी तुम्ही उद्या न्यायालयात हजर राहावे, असे खंडपीठाने सांगितले.