बलात्कार पीडितेसोबत लग्न करण्यासाठी अंतरिम जामीन द्यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.  केरळमधील आरोपीने सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. या प्रकरणात केरळच्या एका चर्चमधील ख्रिश्चन धर्मगुरु रॉबिन वडक्कुमचेरी हा आरोपी आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरोपीला केरळ उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे.

दरम्यान, या प्रकरणातील बलात्कार पीडितेनेदेखील शनिवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन रॉबिनशी लग्न करण्याची परवानगी मागितली होती. बाळाला कायदेशिररित्या रॉबिनचे नाव द्यायचे असल्याने परवानगी देण्यात यावी, असं तिने याचिकेत म्हटलं होतं. यावर्षी फेब्रुवारी महिन्यातही आरोपी रॉबिनने पीडितेसोबत लग्न करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका केरळ उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली होती.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणातील पीडित मुलगी एका ख्रिश्चन कुटुंबातील आहे. आरोपी रॉबिन धर्मगुरु म्हणून काम करत होता. मे २०१६ मध्ये पीडित मुलगी दहावीत होती. १० वी च्या परीक्षेनंतर डाटा एंट्रीच्या कामासाठी पारसोनेजला गेली. दुपारी, इतर मुली दूर असताना रॉबिन पीडितेला त्याच्या खोलीमध्ये घेऊन गेला आणि बलात्कार केला. या घटनेची कुठेही वाच्यता न करण्याची धमकी देत आरोपीने पीडितेला घरी जाऊ दिले. घाबरलेल्या मुलीनेही घटनेबद्दल तिच्या कुटुंबातील कुणालाही काहीच सांगितले नाही. नेहमीप्रमाणे ती शाळेत गेली आणि दररोज स्थानिक चर्चमध्ये प्रार्थनेसाठी हजर राहायची. दरम्यान, ही मुलगी बलात्कारामुळे गर्भवती राहिली होती. पण कोणालाही याबाबत लक्षात आले नाही.

हे प्रकरण बाहेर आल्यानंतर फेब्रुवारी २०१९ मध्ये न्यायालयाने रॉबिनला २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर चर्चने त्याला २०२०मध्ये त्याच्या पदावरून काढून टाकले होते.