वादग्रस्त विधाने आणि अनेक उचापतींसाठी प्रसिद्ध असणारे स्वयंघोषित धर्मगुरू स्वामी ओम बाबा याला गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने सणसणीत चपराक लगावली. स्वामी ओम बाबाने काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीशांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. सरन्यायाधीश जे.एस. केहार आणि न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर काल याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने स्वामी ओम बाबाची ही याचिका म्हणजे निव्वळ पब्लिसिटी स्टंट असल्याचे खडे बोल सुनावले. तसेच ही याचिका दाखल करून न्यायालयाचा अमूल्य वेळ फुकट घालवल्याबद्दल स्वामी ओम बाबा आणि आणखी एका याचिकाकर्त्याला १० लाखांचा दंड ठोठावला.

सर्वोच्च न्यायालयाने काल वैयक्तिक गोपनीयतेच्या अधिकारासंदर्भात ऐतिहासिक निकाल सुनावल्यानंतर स्वामी ओम बाबाच्या याचिकेवर सुनावणी झाली. ही सुनावणी फार वेळ चालली नाही. मात्र, या दरम्यान न्यायाधीशांनी स्वामी ओम बाबाला चांगलेच फैलावर घेतले. तुम्ही ही याचिका यापूर्वी दाखल का केली नाही? त्यावर स्वामी ओम बाबाने म्हटले की, मी तुमची नियुक्ती झाल्यापासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे. त्यासाठी मी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींकडेही याचिका पाठवली होती, असे त्यांनी सांगितले.

तिहेरी तलाकवर बोलणं स्वामी ओमला महागात पडलं; जमावानं दिला चोप

मात्र, सरन्यायाधीश जे.एस. केहार यांनी आम्हाला हा सर्व प्रकार पब्लिसिटी स्टंट वाटत असल्याचे सांगितले. इतके खडसावल्यानंतरही स्वामी ओम बाबा माघार घ्यायला तयार नव्हता. देवाच्या कृपेने मला लोकप्रिय होण्यासाठी काहीही करण्याची गरज नाही. जगभरात माझे ५० कोटी अनुयायी आहेत, अशी फुशारकी त्यांनी मारली. मात्र, थोड्याचवेळात हेच वक्तव्य त्यांच्या अंगलट आले. तुम्ही सर्वोच्च न्यायालयालाचा विषय इतक्या थट्टेने घेऊ शकत नाही. दिवसेंदिवस ही सवय वाढत चालली आहे. हे थांबायलाच पाहिजे, असे सांगत न्यायालयाने स्वामी ओम बाबाला १० लाखांचा दंड ठोठावला. त्यावर मला कुणावरही आरोप करायचे नाहीत, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न स्वामी ओम बाबाने केला. मात्र, तुम्ही आमच्या प्रश्नांची समाधनकारक उत्तर देऊ शकला नाहीत तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होणारच, असे न्यायालयाने ठणकावून सांगितले. तेव्हा स्वामी ओम बाबाने मी एक सामान्य माणूस असून माझ्याकडे १० लाख काय दहा रूपयेही नाहीत, असे सांगत हात वर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने स्वामी ओम बाबाला त्याच्याच शब्दांमध्ये पकडले. जगभरात तुमचे ५० कोटी अनुयायी आहेत, असे तुम्ही म्हणता. मग त्यांच्याकडूनच एक-एक रूपया गोळा करून दंडाची रक्कम भरा, असे न्यायालयाने सांगितले.