सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी घेतलेली पत्रकार परिषद ही लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे. त्यांनी मांडलेल्या प्रश्नांकडे केंद्राने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. थोड्याच वेळापूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका मांडली. तसेच जस्टिस लोया मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली. आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे. त्याच न्यायव्यवस्थेत काम करणाऱ्या न्यायाधीशांनी समोर येऊन व्यथा सांगावी हे यापूर्वी कधीही घडले नव्हते. असे घडणे हे लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवी आहे असेही राहुल गांधी यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ न्यायाधीशांनी थेट सरन्यायाधीशांच्या धोरणांवर टीका करण्याचा पहिलाच प्रसंग लोकशाहीत घडला. लोकशाही धोक्यात असल्याचेही मत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले. देशभरातून सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबत टीका होते आहे. हे सगळे लोकशाहीसाठी धोक्याचे आहे असेही मत त्यांनी मांडले.

सुप्रीम कोर्टातील प्रशासनाच्या कामकाजात मागील दोन महिन्यांपासून अनियमितता होती आम्ही या संदर्भात सरन्यायाधीशांनीही पत्र लिहिले होते मात्र आता आमचा नाईलाज झाला असा गंभीर आरोप सुप्रीम कोर्टाच्या चार वरिष्ठ न्यायाधीशांनी शुक्रवारी केल्याने एकच खळबळ उडाली. एवढेच नाही तर या सगळ्यांनी थेट पत्रकार परिषद घेऊनच आपली भूमिका मांडली.

सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर, कुरियन जोसेफ यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. न्या. चेलमेश्वर म्हणाले, ही एक असामान्य घटना आहे. सुप्रीम कोर्टाच्या प्रशासकीय कामकाजात अनियमितता आहे. न्यायव्यवस्थेच्या निष्ठेवरच प्रश्न उपस्थित होत आहेत.आम्ही या संदर्भात सरन्यायाधीशांना एक पत्र पाठवले, पण अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. दोन महिन्यांच्या घटनाक्रमानंतर आम्हाला माध्यमांसमोर येणे गरजेचे होते. आता जनतेनेच योग्य काय ते ठरवावे, असे त्यांनी सांगितले. न्यायव्यवस्था टिकली तरच लोकशाही टिकेल, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

याच पत्रकार परिषदेनंतर देशभरातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे पत्रकार परिषद घेऊन वरिष्ठ न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांवर टीका केली आहे. त्याचमुळे या प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली पाहिजे असे मत मांडले आहे.