मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या (व्यापम) प्रवेश आणि भरतीमध्ये मोठय़ा प्रमाणावर झालेल्या घोटाळ्याचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. या घोटाळ्याशी संबंधित आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे, आजवर मरण पावलेल्या अशा व्यक्तींच्या मृत्यूच्या तपासाचाही यात समावेश आहे.
या घोटाळ्याचा सीबीआयमार्फत तपास करण्यात यावा, अशी विनंती करणाऱ्या याचिकांवरील सुनावणीत हा आदेश देतानाच, या घोटाळ्यात आरोपी करण्यात आलेले राज्यपाल रामनरेश यादव यांना हटवण्यात यावे, या मागणीबाबत केंद्र व राज्य सरकारने आपली बाजू मांडावी, अशी नोटीस सर्वोच्च न्यायालयाने जारी केली. राज्यपाल म्हणून आपल्याला अटकेपासून संरक्षण असल्याच्या आधारावर यादव यांनी उच्च न्यायालयातून अनुकूल आदेश मिळवला होता.
या घोटाळ्यामुळे विश्वासार्हता धोक्यात आलेले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘माझ्यावर मोठे दडपण होते’, असे सांगून न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत केले. व्यापम घोटाळ्याशी संबंधित सर्व प्रकरणे मध्यप्रदेश पोलिसांच्या विशेष कृतीदलाकडून सोमवापर्यंत ताब्यात घ्यावीत व तसा अहवाल २४ जुलै रोजी सादर करावा. त्या दिवशी न्यायालय याचिकाकर्त्यांच्या विनंतीनुसार या तपासावर देखरेखीची जबाबदारी घेईल, असे सरन्यायाधीश न्या. एच.एल. दत्तू यांच्या खंडपीठाने सांगितले. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) आणि विशेष कृती दल (एसएटीएफ) यांच्याकडून सीबीआयला सोपवण्यास राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर व्यापमशी संबंधित सर्व प्रकरणे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. व्यापम घोटाळा आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींचे मृत्यू यांचा तपास सीबीआयला सोपवण्यास राज्य सरकारची काही हरकत नसल्याच्या अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सरकारच्या वतीने केलेल्या निवेदनाची न्यायालयाने नोंद घेतली. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग, व्यापम घोटाळ्यातील ‘व्हिसलब्लोअर’ असलेले आशीष चतुर्वेदी व प्रशांत पांडे, ‘आप’चे नेते कुमार विश्वास आणि वकिलांचा एक गट यांनी केलेल्या याचिकांवर न्या. एच.एल. दत्तू, न्या. अरुण मिश्रा व न्या. अमितावा रॉय यांच्या खंडपीठाने या घोटाळ्याच्या सीबीआय तपासाचा आदेश दिला.
न्यायालयाने हा आदेश दिला असतानाच, या घोटाळ्यातील आणखी एका साक्षीदाराचा मृत्यू झाल्याची माहिती विशेष न्यायालयाला देण्यात आल्याचे वृत्त भोपाळवरून हाती आले. संजयसिंग यादव (३५) याचे गेल्या ८ फेब्रुवारीला भोपाळमधील एका खासगी रुग्णालयात आजाराने निधन झाल्याचे आतापर्यंत या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या विशेष कृती दलाने न्यायालयाला सांगितले. घोटाळ्याशी संबंधित असलेले ४९ लोक आतापर्यंत मरण पावल्याचा दावा काँग्रेसने काल केला होता.