त्वचा उजळवण्याचा दावा करणाऱ्या प्रसिद्ध कंपनीच्या क्रिमने फरक पडला नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणाऱ्या याचिकाकर्त्यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. अशा कंपन्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, या मागणीसाठी गुवाहाटीमधील एक डॉक्टर चंद्रलेखा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती न्यायालयाने फेटाळली. या संदर्भात सर्वोच्च न्यायालय काही करू शकत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने याचिकाकर्त्यांना ग्राहक न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला.
त्वचा उजळवण्याचा दावा करणाऱ्या कंपनीचे क्रिम लावून काहीच फरक पडला नाही, तर त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय काहीच करू शकत नाही. अशा प्रकारचे खटले हे ग्राहक न्यायालयाकडे दाखल केले पाहिजेत. अशा खटल्यांवर सुनावणी करणे सर्वोच्च न्यायालयाचे काम नाही, असे सरन्यायाधीश एच एल दत्तू यांनी स्पष्ट केले. कॉस्मेटिक उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्या लोकांना फसवत आहेत. त्यामुळे त्यांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर बंधने आणली पाहिजेत आणि या संदर्भात नवा कायदाही केला पाहिजे, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती.