लाऊडस्पीकरचा वापर करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी करत याचिका करणाऱ्या भाजपाला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. पश्चिम बंगालमधील भाजपाने सर्वोच्च न्यायालयात ही याचिका केली होती. पश्चिम बंगाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परिक्षा असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा येऊ नये यासाठी शैक्षणिक संस्थांजवळ आणि रहिवाशी इमारतींमध्ये लाऊडस्पीकच्या वापरावर बंदी घातली आहे. २०१३ मध्ये हा निर्णय घेण्यात आला होता.
पश्चिम बंगालमधील भाजपा युनिटने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत हा निर्णय राजकीय पक्षाचा जनतेकडून समर्थन मिळवण्याच्या हक्काचं उल्लंघन करत असल्याचा दावा केला. सोबतच या निर्णयामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचं त्यांनी म्हटलं. पण सर्वोच्च न्यायालयाने तुमच्या प्रचारसभांपेक्षा विद्यार्थ्यांचा अभ्यास महत्त्वाचा असल्याचं सांगत भाजपाची याचिका फेटाळून लावली.
ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधात लढा पुकारणाऱ्या भाजपाला सर्वोच्च न्यायालयाने दुसऱ्यांदा असा दणका दिला आहे. याआधी न्यायालयाने राज्य सरकारच्या भाजपाच्या रथ यात्रेवर घातलेल्या बंदी घालण्याचा निर्णयाला रद्द करण्यास नकार दिला होता. ममता बॅनर्जी आणि भाजपामध्ये गेल्या काही दिवसांपासून शीतयुद्ध सुरु असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. बंगाल सरकारने याआधी भाजपाध्यक्ष अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, शिवराज सिंह चौहान यांच्या हेलिकॉप्टर लँडिंगला परवानगी नाकारली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 12, 2019 2:54 pm