चीनच्या भिंतीसारखीच (ग्रेट वॉल ऑफ चायना) एक भिंत भारताच्या सीमेवर उभारण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत अशी मागणी करणारी याचिका ‘पूर्णपणे चुकीची’ असल्याचे सांगून सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली आहे.अमेरिकादेखील मेक्सिकोलगतच्या संपूर्ण सीमेवर भिंत बांधण्यात यशस्वी झाला नसताना भारत अशी भिंत कशी बांधू शकतो, असा प्रश्न सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने केला.

सुमारे २१,१९६ किलोमीटर लांबीची चीनची ऐतिहासिक भिंत म्हणजे चीनच्या उत्तर सीमेवरची तटबंदीची मालिका असून, भटक्या जमातींचे हल्ले व आक्रमण यापासून राजवटीचे रक्षण करण्यासाठी ती बांधली गेली होती. सीमेपलीकडील दहशतवाद आणि देशात होणारी अमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी देशाच्या सीमेवर अशीच भिंत बांधण्यास सरकारला सांगावे, अशी मागणी एका नोंदणीकृत संघटनेने याचिकेत केली होती.

एवढी मोठी भिंत बांधण्यासाठी पैसा कुठे आहे? तुम्ही या बांधकामाचा खर्च कराल काय? तुम्ही खर्च करणार असल्याचे आम्ही सरकारला सांगावे काय, अशी प्रश्नांची सरबत्ती करून खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली.