कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेले दिल्लीचे माजी विधीमंत्री सोमनाथ भारती यांची अटक टळण्यासाठीची अखेरची आशाही मावळली आहे. उच्च न्यायालयाच्या पाठोपाठ आता सर्वोच्च न्यायालयानेही सोमनाथ भारती यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी फेटाळून लावला असून संध्याकाळपर्यंत शरण येण्याचेही आदेश दिले आहेत. भारती यांच्या पत्नी लिपिका मित्रा यांनी त्यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून सोमनाथ भारती फरार आहेत. अटक टाळण्यासाठी भारती यांनी सत्र आणि उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, दोन्ही न्यायालयाकडून भारती यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला केराची टोपली दाखविण्यात आली. अखेरीस सोमनाथ भारती यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण तेथेही भारती यांची पुरती निराशा झाली. सोमनाथ भारती यांनी आधी आज संध्याकाळपर्यंत पोलिसांना शरण यावे. आम्हाला पुढील निर्णय घेण्यास भाग पाडू नये, अशा स्पष्ट शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एच.एल.दत्तू यांनी भारती यांचा जामीन अर्ज फेटाळताना सुनावले आहे.