लहान मुलांना हिपेटायटिस-बी किंवा घशात जिवाणूंचा प्रार्दूभाव झाल्यास दिल्या जाणाऱया पेंटाव्हॅलेंट औषधावर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने या याचिकेवर केंद्र सरकारकडून त्यांची बाजू मांडणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
डॉ. योगेश जैन यांनी ही याचिका दाखल केली आहे. पेंटाव्हॅलेंट औषधाचा लहान मुलांवर दुष्परिणाम होत असून, यामुळे २१ चिमुरड्यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे. याच याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली असून, चार आठवड्यामध्ये आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत. सरन्यायाधीश पी. सथाशिवम यांच्या नेतृत्त्वाखालील पीठामध्ये सोमवारी याप्रकरणी सुनावणी झाली.
अमेरिका, जपान, पाकिस्तान, श्रीलंका आणि अन्य अनेक देशांमध्ये या औषधाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे भारतातही या औषधावर बंदी घालण्याची मागणी याचिकाकर्त्यांचे वकील ऍडव्होकेट कॉलिन गोन्साल्विस यांनी केली. सर्वात आधी तामिळनाडू आणि केरळमध्ये लहान मुलांना हे औषध देण्यात आले. २०११ मध्ये या औषधामुळे २१ बालकांचा मृत्यू झाला, असेही याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.