दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी तरुणीवर झालेल्या भीषण बलात्कारप्रकरणी चार आरोपींना उच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यांच्यापैकी मुकेश आणि पवन यांना ठोठावण्यात आलेल्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने ३१ मार्चपर्यंत शनिवारी स्थगिती दिली.
खंडपीठाचे न्या. रंजना प्रकाश देसाई व शिवकीर्ती सिंग यांनी, याप्रकरणी झालेल्या तातडीच्या सुनावणीवेळी हा आदेश बजावला. न्यायाधीशांनी तसा आदेश तिहार तुरुंगातील अधिकाऱ्यांना कळविला आहे.
हे प्रकरण योग्य खंडपीठासमोर येण्यासाठी संबंधित आरोपींनी सरन्यायाधीशांकडे आठ दिवसांत अर्ज करावा, असाही आदेश खंडपीठाने दिला. अ‍ॅड. एम. एल.  शर्मा यांनी या दोघांच्या वतीने अर्ज दाखल केला तेव्हा तुम्ही अक्षय ठाकूर आणि विनय शर्मा यांच्यावतीनेही बाजू मांडत आहात काय, असे विचारले असता केवळ मुकेश व पवन यांची बाजू आपण मांडत असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.