नवी दिल्ली : सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल ही आपली आई असल्याचा दावा करणाऱ्या एका महिलेच्या याचिकेवर तिरुअनंतपूरममधील न्यायालयात सुरू असलेल्या कार्यवाहीला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

अनुराधा पौडवाल यांनी ही याचिका मुंबईत वर्ग करण्यासाठी याचिका केली असून त्याबाबत सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने या ४६ वर्षीय महिलेला नोटीस पाठविली आहे.

आपण अनुराधा पौडवाल यांची मुलगी असल्याचा दावा करणारी याचिका या महिलेने तिरुअनंतपूरम न्यायालयात केली आहे. आपले बालपण हिरावून घेतल्याबद्दल या महिलेने पौडवाल यांच्याकडे ५० कोटी रुपये नुकसानभरपाईची मागणीही याचिकेद्वारे केली आहे.

या महिलेचे नाव करमाला मॉडेक्स असे आहे. अनुराधा पौडवाल यांना व्यवसायातून उसंत मिळत नसल्याने त्यांनी १९७४ मध्ये आपल्याला पोन्नाचन आणि अ‍ॅग्नेस या दाम्पत्याकडे सोपविले होते, असे याचिकेत म्हटले आहे. आम्ही अनेकदा अनुराधा पौडवाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कधीही प्रतिसाद मिळाला नाही, असे करमाला यांच्या वकिलांनी म्हटले आहे.