पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरलेले विरोधक मांजरी, कुत्रे, साप-मुंगूस यांच्यासारखे एकत्र आलेत. शरद पवारांनी सांगितले की राहुल गांधी सरकारविरोधात बोलतात अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली. सपा-बसपा यांच्यातून विस्तव जात नव्हता. मात्र साप आणि मुंगूस यांच्यासारखे असलेले हे पक्ष एकत्र आले आहेत असे म्हणत अमित शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजपाची ताकद वाढली आहे. भाजपा हा देशातला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याचमुळे विरोधकांना मोदींची भीती वाटते आहे. मोदींच्या भीतीमुळेच सगळे विरोधक त्यांच्याविरोधात एकवटले आहेत.

दहा सदस्यांनी सुरु झालेल्या भाजपाचे आज ११ कोटी सदस्य आहेत. भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. गरीबाच्या कल्याणासाठी सत्तेला साधन बनवण्याचा आमचा विचार आहे असे अमित शहा म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीबाच्या घरात सुख पोहोचवण्याचे काम केले. सबका साथ, सबका विकासाचे सूत्र साकार केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याइतका स्वच्छ आणि पारदर्शी कारभार आजवर कोणीही केलेला नाही. देशातल्या सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचे धोरण लोकांना पटले आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झालेले नेते आहेत असेही अमित शाह यांनी म्हटले आहे.

अमित शाह यांनी आज झालेल्या मेळाव्यानंतर पत्रकार परिषदही घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना सोबत आली तर आम्हाला आनंदच होईल असेही म्हटले आहे. राज्यात शिवसेना आणि भाजपा यांच्यात फारसे पटत नसल्याचे चित्र सत्ता स्थापन झाल्यापासून आहे. अशात आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचाही नारा दिला आहे. अमित शाह उद्या (शनिवार) त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. ही भेट झाली तर अमित शाह हे उद्धव ठाकरेंचे मन वळवण्याचाही प्रयत्न करतील असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. हे सगळे असले तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भीतीमुळेच विरोधक कुत्रे, मांजर आणि साप-मुंगूस यांच्यासारखे एकत्र आले आहेत असे म्हणत त्यांनी काँग्रेससह सगळ्याच विरोधकांना टोला लगावला आहे. आता या सगळ्या टीकेवर काँग्रेसकडून काय उत्तर दिले जाणार हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.