विद्यार्थ्यांना अयोध्येतील बाबरी मशीद विध्वंसाचं प्रात्यक्षिक सादर करायला लावल्याने कर्नाटक पोलिसांनी शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. श्री राम विद्या केंद्र या शाळेत हा प्रकार घडला आहे. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना हे प्रात्यक्षिक सादर करण्यास सांगण्यात आलं होतं. पोलिसांनी याप्रकरणी शाळेच्या नियामक मंडळातील सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही शाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्याची असून त्याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेली नाटकात सहभागी विद्यार्थ्यांना बाबरी मशिदीचा पोस्टर खाली ओढायला लावण्यात आलं. यामधून बाबरी विध्वंसाचं प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शंभराहून जास्त विद्यार्थी पोस्टरच्या दिशेने जाऊन ते खाली ओढताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी प्रभू श्री रामाच्या नावे घोषणादेखील देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री सदानंद गौडा आणि पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी उपस्थित होत्या अशी माहिती एएनआयने दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.