राष्ट्रपिता महात्मा गांधींची १५० वी जयंती संपूर्ण देशभरात उत्साहात साजरी करण्याची जोरदार तयारी सुरु असताना त्यांनी ९७ वर्षांपूर्वी स्थापन केलेली शाळा निधी अभावी बंद पडल्याचे समोर आले आहे. महात्मा गांधींनी प्रसिद्ध गुजरात विद्यापीठासह १९२१ साली अहमदाबादमध्ये राष्ट्रीय शाळेची स्थापना केली होती. मागच्या दोन महिन्यांपासून ही शाळा बंद पडली आहे. त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या पहिली ते सातवीतल्या विद्यार्थ्यांनी अन्यत्र दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला आहे.

प्रसिद्ध अल्फ्रेड हायस्कूलपासून ही शाळा फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे. या अल्फ्रेड हायस्कूलचे जागतिक दर्जाच्या संग्रहालयात रुपांतर करण्यात आले असून येत्या ३० सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. १ फेब्रुवारी १९२१ रोजी राष्ट्रीय शाळा सुरु झाली. स्वत: महात्मा गांधींनी या शाळेचे संविधान लिहिले होते. राष्ट्र निर्मितीचे विचार मुलांच्या मनावर बिंबवण्याचा त्यांचा उद्देश होता.

या शाळेच्या प्रार्थना हॉलमध्ये स्वत: महात्मा गांधींनी प्रार्थना म्हटली होती तसेच स्वातंत्र्य संग्रामाच्यावेळी १९३९ साली इथे उपोषणही केले होते. शहरातील उत्तम शाळांमध्ये राष्ट्रीय शाळेची गणना व्हायची. गुजरात विद्यापीठाचे सध्याचे व्हाईस चांसलर अनामिक शाह सुद्धा याच शाळेत शिकले आहेत.

गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून आल्यानंतर ब्रिटीश शिक्षणपद्धती गुलामगिरीच्या मूळाशी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. स्वातंत्र्य चळवळीसाठी लोकांना तयार करण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत बदल आवश्यक होता. त्यातूनच राष्ट्रीय शाळेचा जन्म झाला. तरुणांनी मातृभाषेत शिक्षण घेतले पाहिजे असे गांधीजी यांचे मत होते. १९७० ते २००० या तीस वर्षात १ हजार विद्यार्थी शाळेत होते.

राष्ट्रीय शाळा ही देणगीवर चालायची पण हळूहळू देणगीचा ओघ आटला आणि शाळेला उतरती कळा लागली. शाळेची काही जागा भाडयावर दिली होती त्यातून नियमित उत्पन्न मिळायचे. हळूहळू विद्यार्थी संख्या कमी झाली. चालू वर्षात फक्त ३७ विद्यार्थी शाळेमध्ये होते. राष्ट्रीय शाळा ट्रस्टने बुकलेट प्रसिद्ध करुन जनता आणि उद्योगपतींकडे निधीची मागणी केली. शाळा चालवण्यासाठी वर्षाला ८ ते ९ लाख रुपयांची गरज आहे. पण निधी मिळत नसल्याने शाळा बंद करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही असे शाळेचे ट्रस्टी जितू भट्ट यांनी सांगितले.