पंजाबच्या संगरूर जिल्ह्य़ात शनिवारी एका खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी व्हॅनने पेट घेतल्यामुळे चार मुले जळून मरण पावली.

लोंगोवाल शहरानजीक हा अपघात झाला, त्यावेळी व्हॅनध्ये १२ मुले होती. जवळच्या शेतांमध्ये काम करणाऱ्या लोकांनी ८ मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले. मात्र १० ते १२ वर्षे वयोगटातील ४ मुले जळून खाक झाली, असे पोलिसांनी सांगितले.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या  दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचा आदेश दिला आहे. या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल, असे त्यांनी ट्विटरवर लिहिले.

व्हॅनला कशामुळे आग लागली हे लगेच कळू शकले नाही. हा अपघात घडला, त्यावेळी मुले शाळेतून घरी परतत होती. व्हॅन पेटली तेव्हा  चालकाने तिची दारे उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र ती उघडली नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली.