जम्मू-काश्मीरचे कलम ३७० हटवण्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी बंद ठेवण्यात आलेल्या श्रीनगर आणि राजौरीमधील १९० पेक्षा अधिक प्राथमिक शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. सुमारे १४ दिवस इथल्या शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून अभ्यासाचे नुकसान झाल्याने आता ही चिमुकली मोठ्या उत्साहाने शाळांमध्ये दाखल होत आहेत. मात्र, सध्या प्राथमिक शाळांच सुरु करण्यात आल्या आहेत. माध्यमिक शाळा आणखी काही दिवस बंद राहणार असल्याचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

जोपर्यंत या शाळा बंद राहिल्या आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान झाले ते भरून काढण्यासाठी या महिन्यानंतर अतिरिक्त वर्ग भरवण्यात येणार आहेत. इथली परिस्थीती अजूनही तणावपूर्ण आहे ही परिस्थिती सामान्य झाल्यानंतर अन्य जिल्यांमधील शाळाही पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर यादरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी सैन्यासह इतर सुरक्षा दलांचे जवान २४ तास शाळांभोवती सैनात करण्यात असणार आहेत.

जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कंसल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, सध्या केवळ श्रीनगरमधील प्राथमिक शाळांच पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. श्रीनगरमधील ज्या भागांतील शाळा उघडण्यात येणार आहेत त्यामध्ये लासजान, सांगरी, पंथचौक, नौगाम, राजबाग, जवाहर नगर, गगरीबाल, धारा, थीड, बाटमालू आणइ शाल्टेंग या भागांचा समावेश आहे.

जसजशी इथली परिस्थिती सामान्य होत जाईल तसतसे इतर शाळांमध्येही नियमितपणे वर्ग सुरु होतील. काश्मीर खोऱ्यात निर्बंध शिथिल केले जात आहेत. स्थानिक अधिकारी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. लवकरच आणखी काही निर्बंध हटवले जातील, असेही कंसल यांनी सांगतले आहे.