तब्बल पंधरवडाभरानंतर काश्मीर खोऱ्यातील शाळा सोमवारी उघडल्या, मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यंत कमी होती. दगडफेकीचे किरकोळ प्रकार वगळता जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणारी कोणतीही मोठी घटना घडली नसून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे, असा दावा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला.

जम्मू-काश्मीरच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या संचालक सईद सहरिश असगर यांनी पत्रकारांना सांगितले की, जम्मू भागात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी एकही मोठी घटना घडलेली नाही.

काश्मीरमध्ये सोमवारी शाळा सुरू झाल्या, निर्बंध शिथिल केल्यामुळे शिक्षकही शाळेत उपस्थित होते, परंतु विद्यार्थ्यांची संख्या मात्र नगण्य होती. जम्मूच्या पाच सीमावर्ती जिल्ह्य़ांमधील बहुतांश शाळाही सोमवारी सुरू झाल्या. या क्षेत्राच्या बहुतांश भागातील निर्बंध अधिकाऱ्यांनी उठवल्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पूर्ण उपस्थिती होती असेसांगण्यात आले.

खासगी शाळा मात्र सोमवारीही बंदच राहिल्या. गेल्या दोन दिवसांत वाढलेला तणाव लक्षात घेता मुलांना शाळेत पाठवण्याचा धोका आम्ही पत्करू इच्छित नाही, असे फारूक अहमद दार या पालकाने एक्स्प्रेस वृत्तसंस्थेला सांगितले.

राजौरी आणि पूंछ हे सीमावर्ती जिल्हे, चिनाबच्या खोऱ्यातील रामबन आणि दोडा हे जिल्हे आणि किश्तवारचा काही भाग येथील शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू झाल्या. या भागातील एकूण स्थिती शांततापूर्ण असून, शिक्षण संस्थांमध्ये संपूर्ण उपस्थिती होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यापूर्वी १० ऑगस्टला या भागातील जम्मू, कथुआ, सांबा, उधमपूर आणि रियासी या पाच जिल्ह्य़ांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश मागे घेण्यात आल्यानंतर तेथील शिक्षण संस्था पुन्हा सुरू झाल्या होत्या.

राजौरी जिल्ह्य़ातील सर्व शैक्षणिक संस्था सोमवारी पुन्हा सुरू झाल्या आहेत, असे उपायुक्त एजाझ असद यांनी सांगितले. जिल्ह्य़ातील परिस्थिती शांत असून, बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्या आहेत, तसेच वाहतूक सुरळीत आहे, असे ते म्हणाले.

कायदा आणि सुव्यवस्था स्थिती सामान्य झाली असल्याने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ अन्वये लागू करण्यात आलेले प्रतिबंधात्मक आदेश मागे घेण्यात आले आहेत. बाजारपेठाही सुरू झाल्या आहेत, असे असद यांनी सांगितले.

मध्य काश्मीरचे जिल्हा उपअधीक्षक व्ही. के बिर्दी म्हणाले की, काही ठिकाणी दगडफेकीच्या किरकोळ घटना घडल्या. परंतु मोठय़ा घटनेची नोंद झालेली नाही.

मोदी-ट्रम्प चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली.  उभय नेत्यांत अर्धा तास सौहार्दपूर्ण चर्चा झाली, असे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानचे नाव न घेता ते म्हणाले की, काही देशांनी भारतात मोठा घातपात घडविण्याच्या दिलेल्या धमक्या आणि त्यांचा भारतविरोधी हिंसक दृष्टिकोन हा विभागीय शांततेसाठी घातक आहे.

चिदम्बरम यांची टीका : काश्मीरमध्ये सर्व काही सुरळीत असल्याच्या सरकारच्या दाव्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी टीका केली. अनेक नेते स्थानबद्ध आहेत, शाळा उघडल्या आहेत, पण विद्यार्थीच नाहीत, इंटरनेट बंद केले गेले आहेत. सुरळीतपणाची ही नवी व्याख्या आहे, असा टोला चिदम्बरम यांनी लगावला आहे.