भारतातील शाळा आणि महाविद्यालयांत शिकवले जाणारे विज्ञान कालबाह्य़ आहेच, पण अत्यंत कंटाळवाणेही आहे. त्यामुळे आधुनिक प्रयोगाशाळांमधून अशा विज्ञानावर भविष्यात फार काळ संशोधन चालेल असे वाटत नाही, असे परखड मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ, भारतरत्न सीएनआर राव यांनी मंगळवारी व्यक्त केले.
शाळा, महाविद्यालयांतून आपण जे विज्ञान शिकवतो ते फार काळ टिकणारे नाही. जे विज्ञान शिकवले जाते ते फारच कंटाळवाणे आहे. ते पूर्णत: कालबाह्य़ आहे. त्यातही रसायनशास्त्राची अवस्था खूपच वाईट आहे. कोणाला शिकायचे असे रसायनशास्त्र, असा सवाल त्यांनी केला.
 शिकवणे कंटाळवाणे आहेच, पण शिक्षकही कंटाळवाणे आहेत. आपल्याला शिकविण्याची पद्धत सुधारावी लागेल. भारतात अध्यापक आणि अध्यापन या दोन्ही गोष्टी चांगल्या नाहीत. म्हणूनच राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत शिक्षक आणि शिक्षणपद्धती सुधारण्याचे काम हाती घ्यावे लागेल. त्यासाठी काही मानके तयार करावी लागतील, असे राव यांनी स्पष्ट केले.
‘असोचेम’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १७व्या जेआरडी टाटा स्मृती व्याख्यानात राव बोलत होते. ते म्हणाले की, तज्ज्ञांनी या संदर्भात आजवर जे सल्ले दिले ते सरकारने अमलात आणले असते तर देश आज ज्या स्थानी आहे, तिथे दिसला नसता. आपल्याला खूपच अत्याधुनिक असायला हवे होते, मात्र दुर्दैवाने या देशात विज्ञान आणि शिक्षणाला महत्त्व दिले जात नाही. जेव्हा पी. व्ही. नरसिंह राव मनुष्यबळ विकासमंत्री होते तेव्हा मी व्यक्तिश: त्यांच्याशी भेटून शिक्षणासाठीचे राष्ट्रीय धोरण काय असावे, याविषयी मदत केली होती. त्या वेळी त्यांनी शिक्षणावर सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के इतका निधी खर्च व्हायला हवा, असे सुचविले होते; परंतु पंतप्रधानपदी आल्यानंतर या गोष्टीचा त्यांना विसर पडला आणि शिक्षणावर सध्या दोन टक्केच निधी खर्च केला जातो, असेही राव यांनी सांगितल़े