जेव्हा नासाचे मार्स रोव्हर पर्सिव्हिअरन्स मंगळाच्या पृष्ठभागावर उतरले तेव्हा त्याचं नियंत्रण आणि लँडिंग प्रणाली हाताळणारी व्यक्ती ही एक भारतीय वंशाची वैज्ञानिक होती. स्वाती मोहन यांनी पर्सिव्हिअरन्स रोव्हरच्या नियंत्रण आणि लँडिंग सिस्टमचे नेतृत्व केले ज्यात विशेषतः कठीण टचडाउनचे नेव्हीगेशन त्यांनी केले होते.

स्वाती मोहन सुरुवातीपासूनच पर्सिव्हिअरन्स मार्स मिशनशी संबंधित आहेत आणि सात वर्षांपासून या प्रकल्पावर कार्यरत आहेत. त्यांनी नासाच्या कॅसिनी या शनी ग्रहासाठीच्या मिशनसाठी देखील काम केले आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, वयाच्या नवव्या वर्षी पहिल्यांदा ‘स्टार ट्रेक’ हा चित्रपट पाहिल्यानंतर विश्वाच्या वेगवेगळ्या भूभागांच्या सुंदर चित्रणांमुळे त्या अचंबित आणि आश्चर्यचकित झाल्या. त्यांना तेव्हाच कळले होते की आपल्याला हेच करायचे आहे आणि या विश्वातील नवीन आणि सुंदर ठिकाणे शोधायची आहेत.

स्वाती मोहन यांना प्रथम बालरोगतज्ञ व्हायचं होतं, परंतु त्यांचा पहिला भौतिकशास्त्राचा तास आणि त्यांच्या शिक्षिका यामुळे त्यांना अभियांत्रिकी हेच आपल्या अंतराळ संशोधनातील आवड जपण्याचे साधन असल्याचे समजले.

नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) पर्सिव्हिअरन्स या रोव्हरने मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँडींग केले. मंगळाच्या वातावरणातील लँडींग आधीची शेवटची सात मिनिटे ही रोव्हरसाठी फारच कठीण होती.

संपूर्ण जगाने पर्सिव्हिअरन्स या रोव्हरला मंगळाच्या पृष्ठभागावर नाट्यमय आणि कठीण अवस्थेतून जाताना पाहिले. या दरम्यान स्वाती मोहन यांनी शांतता आणि चिकाटीने काम केले. त्यांनी जीएन अँड सी उपप्रणाली आणि या प्रकल्पातील इतर संघ यांच्याशी व्यवस्थितपणे संवाद आणि समन्वय साधला.