जगात पहिल्यांदाच वैज्ञानिकांनी आवाजाचा वापर करून कृत्रिम अणूशी संपर्क साधला,  ध्वनिलहरीं प्रकाशलहरींच्या भूमिकेत जाऊ शकतात, हा पुंज भौतिकीतील सिद्धांत येथे उपयोगात आणण्यात आला आहे. अणू आणि प्रकाश यांच्यातील आंतरक्रिया सर्वाना माहीत आहे व पुंज प्रकाशशास्त्रात याचा विस्तृतपणे अभ्यास करण्यात आला आहे.
असे असले तरी अशाच प्रकारची अभिक्रिया ध्वनी लहरींमध्ये घडवणे फार आव्हानात्मक असते. स्वीडनमधील तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधकांनी ध्वनी लहरी कृत्रिम अणूला जोडून दाखवल्या. संशोधन गटाचे प्रमुख पीर डेलसिंग यांनी सांगितले की, आम्ही पुंज भौतिकीच्या जगात नवे द्वार उघडले असून अणूंचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला आहे. पुंज भौतिकीच्या नियमांचा अभ्यास करून त्याचा फायदा करून घेणे हा आमचा उद्देश आहे. खूप जलद संगणकांमध्ये पुंज भौतिकीचे नियम पाळले जातात व आपण त्यांचे नियंत्रण करू शकतो.
कृत्रिम अणू हे पुंज विद्युत मंडलाचे (क्वांटम इलेक्ट्रिकल सर्किट) उदाहरण असून नेहमीच्या अणूप्रमाणे यातही कणांच्या रूपात ऊर्जा बाहेर टाकली जाते. हा कणांच्या रूपातील प्रकाश असतो, पण चामलर्स प्रयोगातील अणू हा ध्वनीच्या रूपात ऊर्जा सोडतो व ध्वनीचे ग्रहणही करतो. सैद्धांतिक माहितीनुसार अणू हा पुंज कणांमध्ये विभागला जातो असे संशोधन निबंधाचे लेखक मार्टिन गुस्ताफसन यांनी म्हटले आहे. असे कण हे कमकुवत ध्वनी रूपात असतात व ते शोधता येतात असेही गुस्ताफसन यांनी सांगितले. ध्वनी प्रकाशापेक्षा कमी वेगाने जातो, त्यामुळे ध्वनी रूपातील अणूंनी अनेक शक्यतांचे दालन खुले केले आहे. ध्वनीच्या कमी वेगामुळे आपल्याला पुंज कणांचे नियंत्रण करण्यास अवधी मिळतो. प्रकाशकणात तसे करता येत नाही, कारण प्रकाशाचा वेग १ लाख पट असतो. कमी वेगाच्या आवाजाची तरंगलांबी प्रकाशापेक्षा कमी असते. अणू जेव्हा प्रकाशलहरींशी क्रिया करतो तेव्हा त्याची तरंगलांबी कमी असते. ध्वनीच्या तरंगलांबीशी तुलना करता ती जास्त असते; याचा अर्थ ध्वनी स्वरूपातील अणू मोठा असतो व त्याचे गुणधर्म नियंत्रित करता येतात. यात एखादा अणू विशिष्ट ध्वनी कंप्रतांशी जुळू शकेल किंवा त्याच्याशी आंतरक्रिया करू शकेल अशी स्थिती तयार करता येते. या प्रयोगात ४.८ गिगॅहर्ट्झ इतकी कंप्रता वापरली असून ती सूक्ष्मलहरींच्या कंप्रतेशी जवळ जाणारी आहे. आधुनिक बिनतारी संदेशवहनातही या कंप्रतेचा वापर होतो. सांगीतिक भाषेत सांगायचे तर पियानोवरील २० ऑक्टेव्हच्या ध्वनीशी त्याची तुलना करता येईल. ‘सायन्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले होते.