19 February 2019

News Flash

उत्क्रांती सिद्धान्त खोटा ठरवण्याच्या प्रयत्नाविरोधात वैज्ञानिक सक्रिय

आजपासून देशभर डार्विन सप्ताहाचे आयोजन

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

आजपासून देशभर डार्विन सप्ताहाचे आयोजन

डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धान्ताबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आणि माकडापासून माणूस कसा झाला, हे दाखवून देण्यासाठी देशातील वैज्ञानिकांनी आजपासून (१२ फेब्रुवारी) डार्विन सप्ताह साजरा करण्याचे ठरवले आहे!

मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी अलीकडेच डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धान्त वैज्ञानिकदृष्टय़ा चुकीचा असल्याचे मत मांडले होते. ‘डार्विनचा सिद्धान्त शाळेत शिकवण्यात येऊ नये’, असे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य सिंह यांनी केले होते. या अशास्त्रीय वक्तव्याचा प्रतिवाद करण्यासाठी आता वैज्ञानिक प्रयोगशाळेबाहेर पडून लोकांना डार्विनचा सिद्धान्त समजून देण्यासाठी सरसावले आहेत. विज्ञानात राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप ही अलीकडे मोठी डोकेदुखी झाली आहे. त्याविरोधात संघर्ष करण्याचा भाग म्हणून १२ ते १८ फेब्रुवारी या काळात ‘दी इंडिया मार्च फॉर सायन्स ऑर्गनायझिंग कमिटी’ व ‘द ब्रेकथ्रू सायन्स सोसायटी’ यांनी डार्विन सप्ताहाचे आयोजन केले आहे. पश्चिम बंगाल तसेच केरळ, तमिळनाडू व कर्नाटक या राज्यांमध्ये डार्विन सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. या कमिटीने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात विज्ञान क्षेत्रासाठीच्या अपुऱ्या आर्थिक तरतुदीवर निषेध मोर्चाचे आयोजन केले होते.

शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊ!

कोलकाता ‘आयसर’चे सहायक प्राध्यापक सौमित्रो बॅनर्जी यांनी सांगितले की, डार्विन सप्ताहाचा उद्देश डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धान्ताबाबत असलेले गैरसमज दूर करणे हा आहे. नैसर्गिक निवडीच्या पद्धतीने उत्क्रांती कशी होत गेली व एकपेशीय जिवापासून प्रगत जीव कोटय़वधी वर्षांत कसे तयार झाले याची माहिती देण्यात येणार आहे. उत्क्रांती हा आता केवळ वैज्ञानिकांपुरता मर्यादित विषय न ठेवता त्यावर जाहीरपणे चर्चासत्रे घेतली जाणार आहेत. आता आम्ही शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन डार्विनच्या उत्क्रांती सिद्धान्ताबाबत असलेल्या शंका दूर करणार आहोत. तो केवळ सिद्धान्त नाही, त्या गोष्टी अनेक मार्गानी सिद्ध करता येतात.

चार्ल्स डार्विनचा जन्म १२ फेब्रुवारी १८०९ रोजी झाला होता व त्याने उत्क्रांतीचे विज्ञान मांडले होते. द ब्रेकथ्रू सायन्स सोसायटीच्या केरळ शाखेचे पदाधिकारी पी. राजीवन यांनी सांगितले, की सध्याच्या परिस्थितीत डार्विनचा सिद्धान्त हा खरोखर वैज्ञानिक सिद्धान्त आहे हे पटवून देण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत विज्ञानात जेवढय़ा घडामोडी झाल्या त्यात डार्विनचा सिद्धान्त खरा ठरला आहे.

राजकीय सक्रियतेची वेळ

आता वैज्ञानिकांना राजकीय पातळीवर सक्रिय होण्याची वेळ आली आहे, असे वैज्ञानिक आशीष सामंता यांनी सांगितले. गेल्या ९ ऑगस्टला वेगळय़ा मागण्यांसाठी वैज्ञानिक रस्त्यावर उतरले होते. लोकशाहीत प्रत्येकाला मतांचा अधिकार आहे, पण विज्ञानात बरोबर किंवा चूक असे दोनच पर्याय असतात. त्यामुळे विज्ञान हे कला व इतर विषयांपेक्षा वेगळे असते असे वैज्ञानिक अयान बॅनर्जी यांनी सांगितले.

First Published on February 12, 2018 1:01 am

Web Title: scientists celebrate darwin week