किर्गिझस्तानची राजधानी बिश्केकमध्ये होत असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. यावेळी नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचा थेट उल्लेख न करता दहशतवादाला समर्थन देणाऱ्या तसंच फंडिंग करणाऱ्या देशांना जबाबदार ठरवलं गेलं पाहिजे अशी मागणी केली. समाजाला दहशतवादापासून मुक्त करणं गरजेचं असून सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र येण्याची गरज असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं.

‘भारत गेल्या दोन वर्षांपासून कायमस्वरुपी एससीओ सदस्य आहे. एससीओच्या सर्व गोष्टींमध्ये आम्ही सकारात्मकपणे सहभाग घेतला असून योगदान दिलं आहे. एससीओची भुमिका आणि विश्वासार्हता वाढावी याकरिता आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरही योगदान देत आहोत’, असं नरेंद्र मोदींनी यावेळी बोलताना सांगितलं.

यावेळी नरेंद्र मोदींनी अनौपचारिक चर्चेसाठी निमंत्रण स्विकारल्याबद्दल चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचे आभार मानले. जिनपिंग यांना नरेंद्र मोदींनी भारतभेटीचे निमंत्रण दिले होते. ते त्यांनी स्विकारले असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली होती. यावर्षीच जिनपिंग यांचा भारत दौरा होणार आहे. एससीओ देशांसाठी व्हिसाचे नियम शिथील करण्यात आले असल्याची माहिती यावेळी नरेद्र मोदींनी दिली. याशिवाय नूतनीकरणक्षम उर्जा क्षेत्रासाठी भारत घेत असलेल्या मेहनतीवर मोदींनी परिषदेचं लक्ष केंद्रीत केलं.

भारत-चीन-रशिया त्रिपक्षीय बैठक!
भारत, रशिया आणि चीन या देशांची त्रिपक्षीय बैठक या महिनाअखेरीस होणार आहे. जपानमध्ये होत असलेल्या ‘जी-२०’ सदस्यदेशांच्या परिषदेच्या निमित्ताने ही बैठक होणार आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन हे सहभागी होतील