भारत आणि पाकिस्तानमध्ये असलेला तणाव शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेतही पहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुर्णपणे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे दुर्लक्ष करत त्यांच्याशी कोणताही संवाद करणं टाळलं. नरेंद्र मोदींनी इम्रान खान यांना कोणत्या सदिच्छाही दिल्या नाहीत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किरगिझस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी एससीओ नेत्यांसाठी आयोजित केलेल्या अनौपचारिक डिनरआधी नरेंद्र मोदी किंवा इम्रान खान यांनी कोणतीही बैठक घेतली नाही.

डिनरदरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांना कोणत्या सदिच्छाही दिल्या नसल्याचं सुत्रांकडून कळलं आहे. डिनरदरम्यान इम्रान खान नरेंद्र मोदींपासून फक्त तीन खुर्च्या दूर बसले होते. भारताने याआधी एससीओ बैठकीत भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही प्रकारची द्विपक्षीय बैठक पार पडणार नाही असं स्पष्ट केलं होतं.

दहशतवादासाठी पाकिस्तानला जबाबदार ठरवा, मोदींची अप्रत्यक्ष मागणी

भारत-चीन-रशिया त्रिपक्षीय बैठक!

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहून चर्चेची मागणी केल्यानंतरही भारताने आपली कठोर भूमिका बदललेली नाही. इम्रान खान यांनी पत्रात काश्मीरसह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर पाकिस्तान भारताशी चर्चा करु इच्छित असल्याचं म्हटलं होतं.

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी आल्यापासून एससीओ परिषदेत सहभागी होण्याची इम्रान खान यांची ही पहिलीच वेळ आहे. तर लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदीदेखील पहिल्यांदाच परिषदेत सहभागी झाले आहेत. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेतली होती. यावेळी नरेंद्र मोदींनी पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कारवाई करणं गरजेचं आहे, पण तसं होताना दिसत नाही असं सांगितलं होतं.