भारतीय नौदलासाठी बनवण्यात आलेल्या स्कॉर्पिअन या पानबुड्यांबद्दलची गोपनीय माहिती ती भारतातून लीक झाली नसल्याची माहिती नौदलाने दिली आहे. या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल केंद्र सरकारला दिला आहे. चोवीस तासांच्या आत या प्रकराणाची चौकशी करून ही माहिती भारतातून लीक झाली नसल्याचे नौदलाने स्पष्ट केले आहे. फ्रान्सच्या डीसीएनएस या कंपनीला भारतासाठी पानबुड्या बनवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. या पाणबुड्याबद्दलची २२ हजार पानांची गोपनीय माहिती लीक झाली असल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियन माध्यमांनी समोर आणले होते. तसेच भारतीय पाणबुड्याबद्दलची माहिती ही भारतातूनच लीक झाली असल्याचा दावा माध्यमांनी केला होता. त्यानंतर संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश नौदल प्रमुखांना दिले होते.

वाचा : भारतीय नौदलाच्या स्कॉर्पिअन पाणबुड्यांबद्दलची गोपनीय माहिती लीक झाल्याने खळबळ
या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर नौदलाने प्रतिक्रिया दिली आहे. फ्रान्स सरकारशी संपर्क साधून या प्रकरणाची चौकशी करण्याचे तसेच चौकशी अहवाल भारताकडे देण्याची मागणी केली असल्याचेही नौदलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ही माहिती लीक झाली असली तरी सुरक्षेच्या दुष्टीने कोणतेही नुकसान झाले नसल्याचेही नौदलाने सांगितले आहे. तसेच ज्या फ्रान्स कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे त्यांच्याकडूनही लीक प्रकरणातील अहवाल मागवण्यात आला असल्याचे नौदलाने सांगितले आहे.

वाचा : Submarine data leak: स्कॉर्पिअन पाणबुड्या नौदलासाठी इतक्या महत्त्वाच्या का?