स्कॉटलंडने ब्रेग्झिटच्या विध्वंसक परिणामांपासून वाचवण्यासाठी ब्रिटनमधून बाहेर पडण्याचे मनसुबे रचले असून, तेथे नव्याने घेतलेल्या जनमत चाचण्यांत लोकांना स्वातंत्र्य हवे आहे, असेच दिसत असल्याचे त्यांचे प्रथम मंत्री निकोल स्टरजिऑन यांनी म्हटले आहे.

स्कॉटलंडने ब्रिटनमध्ये राहावे की नाही याबाबत पूर्वी जनमत झाले होते त्यात ब्रिटनमध्येच राहावे असा कौल मिळाला होता, पण आताची परिस्थिती वेगळी आहे. स्कॉटलंडने २०१४च्या जनमतात स्वातंत्र्य नाकारले होते व युरोपीय महासंघातून ब्रिटन बाहेर पडल्यानंतर स्कॉटलंडने पुन्हा जनमताची भाषा सुरू केली आहे. पूर्वीचा स्कॉटलंड आता राहिलेला नाही. ब्रेग्झिटच्या बाजूने ५२ टक्के व विरोधात ४८ टक्के मते पडली हे खरे असले तरी स्कॉटलंडमध्ये ६२ टक्के मतदान युरोपीय महासंघात राहण्याच्या बाजूने झाले असून २८ टक्के मतदान बाहेर पडण्याच्या बाजूने झाले आहे. बीबीसीच्या अँड्रय़ू मार शोमध्ये स्टरजिऑन यांनी सांगितले, की ब्रिटनमध्ये जे चालू आहे ते फार घातक आहे त्याचे परिणाम वेदनादायी असून स्कॉटलंडला त्यापासून वाचवण्याचा माझा प्रयत्न आहे. स्कॉटिश लोकांनी दोन वर्षांपूर्वी ब्रिटनपासून स्वातंत्र्य ५५ टक्के विरुद्ध ४५ टक्के मतांनी नाकारले होते, पण गुरुवारी घेतलेल्या जनमताच्या अदमासानुसार बहुतेक लोकांना ब्रेग्झिटमुळे आता ब्रिटनमध्ये राहण्याची इच्छा नाही. ‘संडे टाइम्स’च्या पाहणीनुसार ५९ टक्के लोक ब्रिटनमधून बाहेर पडून युरोपीय महासंघात राहण्याच्या विचाराचे आहेत.