प्रसिद्ध शिल्पकार मृणालिनी मुखर्जी यांचे फुप्फुसांच्या आजाराने सोमवारी रात्री निधन झाले. त्या ६५ वर्षांच्या व अविवाहित होत्या. त्यांच्यावर मंगळवारी दुपारी लोधी गार्डनजवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले, तेव्हा कलाक्षेत्रातील नामवंत उपस्थित होते.
शांतिनिकेतन येथील प्रसिद्ध कलाकार बिनोदबिहारी मुखर्जी व लीला मुखर्जी यांच्या त्या एकमेव कन्या होत्या. ब्राँझ (कांस्य), विशिष्ट धाग्याच्या गाठींपासून, सिरॅमिकपासून त्या शिल्प तयार करीत असत. त्यांचा जन्म १९४९ साली मुंबईत झाला खरा, पण त्या जन्मानेच मुंबईकर. शालेय शिक्षण डेहराडूनमध्ये, शालेय वयापासूनच घर शांतिनिकेतनात आणि बडोदे येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठातून १९६५ ते ७० चित्रकलेची पदवी, तर पुढे तेथेच दिग्गज चित्रकार के. जी. सुब्रमणियन यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षांची भित्तिचित्र-भित्तिशिल्प (म्यूरल) पदविका, असा त्यांचा तरुणपणातील प्रवास झाला. ब्रिटिश कौन्सिलतर्फे १९७८मध्ये मिळालेल्या अभ्यासवृत्तीवर त्या ब्रिटनला गेल्या, तेथून आल्यावर दोरापासून शिल्पे करू लागल्या.
दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए) या महत्त्वाच्या संस्थेत त्यांच्या गेल्या ५० वर्षांतील कलेचे प्रदर्शन २७ जानेवारीपासून  सुरू झाले आहे. एनजीएमएचे संचालक राजीव लोचन, बडोद्यातील त्यांचे सहपाठी व ख्यातनाम मांडणशिल्पकार विवान सुंदरम, त्यांच्या कलेची प्रदर्शने गेल्या २० वर्षांत नेहमीच भरवणारे कलादालन-चालक पीटर नॅगी आदींनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. मृणालिनी यांना प्रेमाने दिल्लू असे म्हणत असत. मृणालिनी यांच्या कला प्रदर्शनाचे उद्घाटन नीलिमा शेख या सहकलाकाराने केले होते, पण स्वत: मृणालिनी आजारी- मॅक्स रुग्णालयात दाखल- असल्याने उपस्थित राहिल्या नव्हत्या.
पॅरिस तसेच हवाना आणि सिडनी या शहरांतील द्वैवार्षिक महाप्रदर्शनांत (अनुक्रमे १९८० तसेच १९८६ सालच्या ‘बिएनाले’मध्ये) मृणालिनी या निमंत्रित कलावंत होत्या. ‘सिडनी बिएनाले’च्या निमित्ताने ऑस्ट्रेलियाच्या पाच शहरांत त्यांची व्याख्यानेही झाली. आधी दोरापासून बनविलेली शिल्पे, मग सिरॅमिक्स माध्यमातील मोठी शिल्पे आणि सिरॅमिक्सला पुरेशी जागा व सुविधा मिळत नाहीत व त्या शिल्पांचे आयुष्य तुलनेने कमी असते, म्हणून अखेर ब्राँझ-शिल्पे अशी स्थित्यंतरे त्यांच्या कलेत झाली.