बेंगळूरुच्या काही भागांमध्ये मंगळवारी रात्रभर झालेल्या हिंसाचारात सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) या पक्षाचा सहभाग असल्याचे उघडकीस आले असून, या संबंधात सखोल तपास केला जाईल, असे कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी सांगितले. एसडीपीआयशी संबंधित चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांचे धागेदोरे कुणाशी आहेत याबाबत पोलीस तपास करत असल्याचे ते म्हणाले.

एसडीपीआय ही ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनेची राजकीय आघाडी आहे.

के.जी. हळ्ळी व डी.जी. हळ्ळी हे भाग कालपासून शांत असून तेथे कुठलीही अप्रिय घटना घडलेली नाही. जसजसा तपास सुरू आहे, तशतशी नवी माहिती उघड होत आहे. याबाबत मी सध्याच तुम्हाला काही सांगू शकत नाही, असे बोम्मई म्हणाले.

आतापर्यंत मिळालेली महिती आणि व्हिडीओ चित्रीकरण यांनुसार प्रामुख्याने एसडीपीआयची भूमिका उघड होत आहे. या पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा जिल्हा सचिव मुझम्मिल पाशा हा यात आघाडीवर असून, फिरोझ, अफरोझ पाशा व शेख आदिल हे सर्वच या पक्षाचे आहेत, अशी माहिती गृहमंत्र्यांनी पत्रकारांना दिली.

एसडीपीआयचे कार्यकर्ते डी.जे. हळ्ळी व के.जी. हळ्ळी यांच्या आसपासच्या भागांमधून आले होते, असे काही व्हिडीओ चित्रीकरणात दिसून आले आहे. या घटनेमागे कोण लोक आहेत, तसेच यापूर्वी घडलेल्या अशाच प्रकारच्या घटनांशी त्यांचा काय संबंध आहेत याबाबत आम्ही खोलवर तपास करू आणि या कारस्थानाचा छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे बोम्मई म्हणाले.

दरम्यान, या घटनेच्या संबंधात देवरा जीवनहळ्ळी ठाण्यात दोन व कडुगोंडानाहळ्ळी ठाण्यात दोन असे पाच एफआयआर पोलिसांनी दाखल केले आहेत.

एका काँग्रेस आमदाराच्या नातेवाईकाच्या समाजमाध्यमावरील प्रक्षोभक पोस्टमुळे चिडलेल्या जमावाने बेंगळूरुच्या पुलकेशीनगरचे आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या निवासस्थानावर आणि डी.जे. हळ्ळी पोलीस ठाण्यावर हल्ला चढवला. त्यांनी अनेक पोलीस व खासगी वाहने पेटवून दिली. या जमावाला काबूत आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन जण ठार झाले होते. या घटनेच्या संबंधात आतापर्यंत १४० लोकांना अटक करण्यात आली आहे.