यंदाच्या उन्हाळ्यात महासागरांच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमान खूप वाढले असून त्याने १९९८ च्या एल निनो वर्षांत जेवढे तापमान होते त्याचाही विक्रम मोडला आहे, असे विश्लेषणात दिसून आले आहे.
चौदा वर्षे महासागरांचे तापमान वाढले नव्हते व त्यामुळे जागतिक तापमानवाढीचा धोका नव्हता. २०००-२०१३ या काळात महासागरांच्या पृष्ठभागाचे तापमान हरितगृहवायू वाढत असूनही फारसे वाढले नव्हते किंबहुना स्थिर होते. या काळाला जागतिक तापमानवाढीची विश्रांती असे म्हणता येईल. त्याबाबत जनता व वैज्ञानिक यांना कुतूहल आहे. त्यानंतर एप्रिल २०१४ पासून परत महासागरांच्या पृष्ठभागाचे तापमान वाढू लागले असे तापमानाच्या आकडेवारीनुसार दिसते. २०१४ मध्ये उत्तर पॅसिफिकमध्ये जागतिक तापमान वाढ झाली होती. त्यावेळी हे तापमान इतके वाढले की त्याने वादळांच्या दिशा बदलल्या, व्यापारी वाऱ्यांना कमकुवत केले. हवाई बेटांवर प्रवाळांचे रंग बदलले असे हवाई इंटरनॅशनल पॅसिफिकर रीसर्च सेंटर विद्यापीठाचे हवामान वैज्ञानिक अ‍ॅक्सेल टिमरमन यांचे म्हणणे आहे.
उत्तर पॅसिफिकमध्ये जानेवारी २०१४ पासून अचानक महासागरांच्या पृष्ठभागाचे तापमान वाढत गेले. त्यानंतर एप्रिल-मे महिन्यात पश्चिमेकडील वाऱ्यांनी बरेच गरम पाणी आणले व ते पश्चिम पॅसिफिकमध्ये साठले व पूर्व पॅसिफिकला विषुवृत्तावरही ते राहिले. त्यामुळे वातावरणात मोठय़ा प्रमाणात उष्णता गेली, पश्चिम पॅसिफिकमध्ये दहा वर्षे अडकलेली उष्णता एकदम बाहेर फेकली गेली. हरितगृहवायूंचे उत्सर्जन व उत्तर पॅसिफिकचे कमकुवत व्यापारी वारे यांनी सागराच्या पृष्ठभागांचे तापमान वाढवले, असे टिमरमन यांनी सांगितले.