केवडिया, गुजरात : गुजरातमधील नर्मदा जिल्ह्य़ातील एकता पुतळा (स्टॅच्यू ऑफ युनिटी)  ते अहमदाबादमधील साबरमती किनारा यादरम्यानच्या  सागरी विमान  (सी-प्लेन) सेवेचे उद्घाटन  शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यांनी या विमानातून सफरही केली.

सरदार सरोवर धरणाजवळच्या  तळे क्रमांक ३ येथे या सेवेचे उद्घाटन  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५ व्या जयंतीनिमित्ताने करण्यात आले. मोदी काही काळ वॉटर एरोड्रोममध्ये थांबले. त्यांनी सागरी विमानसेवेची माहिती घेतली.  विमानात बसून ते अहमदाबाद येथील साबरमती नदीकिनारी उतरले. २०० कि.मीचे हे अंतर विमानाने चाळीस मिनिटात कापले. नदीच्या भागात तरंगते एरोड्रोम उभारण्यात आले आहेत. सरदार सरोवरानजीकच्या तळे क्रमांक तीन येथून प्रवासी या विमानात बसून यापुढे जाऊ शकतील. अहमदाबाद येथे आल्यानंतर मोदी यांनी कोनशिलेचे अनावरण केले. मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आले होते. नंतर ते  विमानतळावर गेले.

केवडियात विमानतळ नाही पण नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणामुळे भरपूर पाणी आहे.  त्यामुळे आता सीप्लेन सेवेमुळे पर्यटक अहमदाबादहून केवडियाला ४० मिनिटांत येऊ शकतील. पाच तासांचा हा रस्ता प्रवास हवाई मार्गे कमी काळात होईल.

‘स्पाइस शटल’ कंपनीची सेवा

सरदार सरोवराजवळची सीप्लेन सेवा स्पाइस जेटची ‘स्पाइस शटल’ ही कंपनी चालवणार आहे.रोज या विमानाची दोन उड्डाणे अहमदाबाद ते केवडिया दरम्यान होतील. एकावेळचे भाडे १५०० रुपये असणार आहे. उडान योजनेअंतर्गत ही सेवा देण्यात आली असून त्याची तिकिटे http://www.spiceshuttle.com या संकेतस्थळावर ३० ऑक्टोबरपासून उपलब्ध करण्यात आली.