दहशतवाद्यांना भारतात घुसवण्यासाठी वापरले जाणारे दीडशे मीटर लांबीचे भुयार सीमा सुरक्षा दलाने जम्मू- काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर रविवारी शोधून काढले. जम्मू- श्रीनगर महामार्गावरील नगरोटा येथे अलीकडेच झालेल्या चकमकीत जे दहशतवादी ठार झाले, त्यांनी या भुयाराचा वापर केला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

नगरोटा येथील चकमकीच्या तपासादरम्यान या भुयाराचा शोध लागला, अशी माहिती पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली. त्यांनी सीमा सुरक्षा दलाचे (जम्मू आघाडी) महानिरीक्षक एन.एस. जमावाल आणि जम्मू परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मुकेश सिंह यांच्यासह भुयारस्थळाचे निरीक्षण केले.

ठार झालेले दहशतवादी सांबा सेक्टरमधील कुठल्यातरी ठिकाणावरून सीमा ओलांडून काश्मीरमध्ये शिरल्याची माहिती पोलिसांना चकमकीच्या ठिकाणावरून पोलिसांना मिळाली होती. ही महत्त्वाची माहिती त्यांनी बीएसएफला पुरवली आणि परिश्रमपूर्वक प्रयत्न करून त्यांनी हे भुयार शोधून काढले, असे सिंग यांनी पत्रकारांना सांगितले.

अद्याप अधिक तपशील मिळाले नसले, तरी सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार या भुयाराच्या तोंडावर झुडपे वाढली होती आणि ते भारतीय हद्दीच्या १५० मीटपर्यंत आत शिरले होते. जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवादाला पाकिस्तान मदत करत असल्याचे आणि प्रोत्साहन देत असल्याचे हे उदाहरण आहे.

सुमारे ५ फूट गुणिले ५ फूट व्यासाच्या या भुयाराचा वापर जैश-ए-मोहम्मदच्या ४ दहशतवाद्यांनी काश्मिरात शिरण्यासाठी केला असल्याचा संशय आहे. नगरोटानजीक बान टोल प्लाझानजीक गुरुवारी सकाळी झालेल्या चकमकीत पोलीस व सुरक्षा दलांनी या चौघांना ठार मारले होते.