दिल्लीतील अत्यंत दाटीवाटीच्या निझामुद्दीन भागातील ‘मरकज’मधील ‘तबलिगी जमात’ या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर देशातील विविध राज्यांत परत गेलेले अनुयायी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना युद्धपातळीवर शोधून काढावे. त्या सर्वाना विलगीकरणात ठेवावे, असे आदेश केंद्र सरकारने बुधवारी सर्व राज्य सरकारांना दिले.

याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी सर्व राज्यांचे मुख्य सचिव तसेच पोलीस महासंचालकांशी दूरसंचार यंत्रणेद्वारे चर्चा केली. आतापर्यंत तमिळनाडूमध्ये ५०, दिल्लीत २४, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी २१, अंदमानमध्ये १०, आसाममध्ये ५, पुदुचेरीमध्ये दोन आणि काश्मीरमध्ये एक याप्रमाणे करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. हे सर्व अनुयायी ‘मरकज’मधून परतले होते. त्यापकी तेलंगणामध्ये सहा, तर काश्मीरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. विविध राज्यांमधील दोन हजार १३७ अनुयायांना शोधण्यात आले आहे.

‘मरकज’ पूर्णत: रिकामे

निझामुद्दीनमधील मरकज हे ३६ तासांच्या कारवाईनंतर पूर्णत: रिकामे करण्यात आले. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार ३६१ जणांना मरकजमधून बाहेर काढण्यात आले असून ६१७ जणांना विलगीकरणात ठेवले आहे. यापैकी काही जणांनी दिल्लीतील इतर सहा मशिदींनाही भेटी दिल्या होत्या. त्यात परदेशी नागरिकांचा समावेश होता. या सर्वाचा शोध दिल्ली पोलिसांनी सुरू केला आहे.

परदेशी अनुयायांचा व्हिसा रद्द 

जानेवारीपासून ७० देशांतील दोन हजारांहून अधिक परदेशी नागरिक पर्यटन व्हिसा घेऊन भारतात आले. ते तबलिगी कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. त्यात बांगलादेशातील ४९३, इंडोनेशियातील ४७२, मलेशियातील १५० आणि थायलंडमधील १४२ जणांचा समावेश आहे. त्यांनी व्हिसाच्या अटींचे उल्लंघन केले असून संबंधित राज्यांनी त्यांचे व्हिसा रद्द करावेत, असे आदेशही केंद्र सरकारने बुधवारी दिले.