राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रमुख शरद कुमार घटनास्थळी दाखल
पंजाबमधील पठाणकोट येथे भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला झाल्यानंतर अजूनही तेथे स्फोटकांचा शोध घेण्याची मोहीम सुरूच आहे. राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रमुख शरद कुमार तपासासाठी प्रत्यक्ष घटनास्थळी आले असून त्यामुळे आता वेगळी माहिती उघड होण्याची अपेक्षा आहे कारण त्यांनी तपासाची दिशा बदलली आहे. पठाणकोट येथे हल्ल्यात सात जवान हुतात्मा, तर सहा दहशतवादी ठार झाले होते. संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांनी काल या हवाई तळाला भेट देऊन सर्व दहशतवादी मारले गेल्याचे सांगितले होते. दहशतवाद्यांकडे ४०-५० किलो बंदुकीच्या गोळ्या, स्वीस व कमांडो चाकू , पिस्तुले, ग्रेनेड बॅरल, एके ४७ रायफली, ३-४ डझन काडतुसे होती असे त्यांनी सांगितले होते.
कुमार यांनी काल असे सांगितले होते की, हल्ल्याचा कट उलगडणे हे आव्हान आहे पण यापूर्वी अनेकदा गुन्हेगारांची ओळख उघड करण्यात संस्थेला यश आले आहे. या प्रकरणात खूप चौकशी करावी लागेल त्यामुळे चौकशी केव्हा पूर्ण होईल हे सांगता येत नाही.
हल्लेखोर कुठल्या देशाचे होते असे विचारले असता त्यांनी सांगितले की, जे पुरावे व दूरध्वनी संदेश आम्ही गोळा केले आहेत त्यावरून ते पाकिस्तानचे होते, या हल्ल्यात कुठल्या संघटनेचा हात होता हे सांगण्याचे त्यांनी टाळले. आधी चौकशी पूर्ण करू नंतर कुणाचा हात होता याचे पुरावे मिळतील. न्यायालयात सगळे सिद्ध करावे लागेल. तपास संस्थेने या हल्ला प्रकरणात तीन गुन्हे काल नोंदवले त्यात दहशतवाद्यांकडून टॅक्सीचालकाचा खून व हवाई तळावरचा हल्ला व पोलीस अधीक्षकांचे अपहरण या तीन प्रकरणांचा समावेश आहे. केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथक पठाणकोटला आले असून ते एनआयएच्या वीसजणांच्या पथकास मदत करीत आहे.
एक संशयित ताब्यात 
पठाणकोट हवाई तळ परिसरात एक बॅग घेऊन संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.
विशिष्ट लक्ष्य ठेवून मोहीम
दहशतवादी तोफगोळे सोडताना गोळीबारही करीत होते तरी राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या म्हणजे एनएसजीच्या कमांडोंनी गरुड दल व लष्कराच्या मदतीने टप्प्याटप्प्याने विशिष्ट लक्ष्ये ठेवून कारवाई केली त्यामुळे सहा दहशतवादी २५० मीटरच्या त्रिज्या परिसरात येण्याआधीच मारले गेले असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या कारवाईत पुरेसा समन्वय होता व १९०० एकर परिसरातील तीन हजार कुटुंबांचे रक्षण करण्यात आले, यात ३०० ब्लॅक कॅट कमांडो सहभागी झाले होते.